पश्चिम बंगालमध्ये आज हाय व्होल्टेज ड्रामा बघायला मिळणार आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आज नंदीग्राममधून आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. तर भाजपाचे उमेदवार सुवेंदू अधिकारी आज नंदीग्राममध्ये एक रोड शो करणार आहेत. त्यामुळे पश्चिम बंगालचे राजकारण आज ढवळून निघण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
ममता बॅनर्जी आज नंदीग्राममधून आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर त्या नंदीग्राममधील प्रसिद्ध शिव मंदिरात दर्शनासाठी जाणार आहेत. त्यानंतर त्या पक्षाच्या महत्वाच्या नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची भेट घेणार आहेत.
त्याच वेळी दुसऱ्या बाजूला त्यांचे विरोधक उमेदवार आणि भाजपाचे उमेदवार सुवेंदू अधिकारी आज सकाळी नंदीग्राममध्ये रोड शो करणार आहेत. टेंगूवा रस्त्यापासून सुरु होणारा हा रोड शो जानकीनाथ मंदिरापर्यंत जाणार आहे. त्यानंतर सुवेंदू अधिकारी त्यांच्या नव्या निवडणूक कार्यालयाचे उदघाटन करणार आहेत. सुवेंदू अधिकारी त्यांचा उमेदवारी अर्ज १२ मार्चला भरणार असल्याची माहिती मिळत आहे.
हे ही वाचा:
गेली अनेक वर्षे नंदीग्रामचं प्रतिनिधित्व करणारे सुवेंदू अधिकारी हे नुकतेच ममतांची साथ सोडून भाजपामध्ये गेलेले आहेत. ममतांच्या कॅबिनेटमध्ये नंबर दोनचे मंत्री असा त्यांचा उल्लेख होत होता. मात्र ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सुवेंदू हे भाजपमध्ये सामील झालेले आहेत.
ममतांना नंदीग्राममधून हरवूनच दाखवेन अन्यथा राजकारण सोडून देईन अशी घोषणा सुवेंदू यांनी केली आहे. २००६ पासून सुवेंदू इथून आमदार म्हणून निवडून येत आहेत. त्यांचे वडील हे या मतदारसंघाचे विद्यमान खासदार आहेत. तसेच सुवेंदू यांचे दोन भाऊही राजकारणात असून त्यांचीही या भागात पकड आहे.