पश्चिम बंगाल मधील ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वातील तृणमूल काँग्रेस पक्षाचे सरकार, ‘जय श्रीराम’ च्या घोषणांविरोधात विधानसभेत प्रस्ताव आणणार आहे. काँग्रेस आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने या प्रस्तावाला समर्थन करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
२३ जानेवारीला नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त कलकत्त्यात केंद्र आणि राज्य सरकारचा एक कार्यक्रम होता. या कार्यक्रमात ममता बॅनर्जींच्या संबोधनापूर्वी प्रेक्षकांमधून जय श्रीरामाच्या घोषणा सुरु झाल्या. ममता बॅनर्जींच्या मते हा त्यांचा अपमान होता. आणि हा अपमान केल्याबद्दल त्यांनी लगेचच मंचावरून बोलायला नकार दिला.
यापूर्वी काँग्रेस पक्षाने या घटनेसंदर्भात असे विधान केले होते की हा मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचा अपमान आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षानेही ही घटना बंगालचा अपमान असल्याचे सांगितले होते.
पश्चिम बंगाल मधील राजकीय विश्लेषकांच्या मते बंगालमधील निवडणुकीत जय श्रीरामाचा मुद्दा चांगलाच गाजणार आहे. त्यामुळेच आता काँग्रेस आणि डाव्या पक्षांनी या प्रस्तावाला विरोध करण्याचे ठरवले आहे.
पश्चिम बंगाल विधान सभेतील विरोधीपक्षनेते अब्दुल मान्नन यांनी या प्रकरणात त्यांना तृणमूलकडून कोणतीही माहिती मिळाली नसल्याचे सांगितले. तर मार्क्सवादी पक्षाचे नेते सुजान चक्रबोर्ती यांनी ममता बॅनर्जींना हुकूमशहा म्हणून संबोधले आहे.
पश्चिम बंगालमध्ये एप्रिल-मे २०२१ मध्ये निवडणूका असणार आहेत. या निवडणुकांमध्ये जय श्रीरामाच्या घोषणा किती गाजणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.