“मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधींचे त्यांच्या पक्षावर नियंत्रण नाही का?”

काँग्रेस नेत्यांच्या वादग्रस्त विधानांवर भाजपाचा संतप्त सवाल

“मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधींचे त्यांच्या पक्षावर नियंत्रण नाही का?”

पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशभरातून संताप व्यक्त केला जात असताना अनेक कॉंग्रेस नेते वादग्रस्त विधाने करून नव्या वादाला तोंड फोडत आहेत. यावरून भाजपाने कॉंग्रेसवर जोरदार निशाणा साधला आहे. भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसवर तीव्र हल्लाबोल करताना भाजपा नेते रविशंकर प्रसाद यांनी म्हटले की, काही काँग्रेस नेत्यांनी केलेल्या टिप्पण्यांचा वापर पाकिस्तान भारताची बदनामी करण्यासाठी करत आहे. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील नेते, आमदार विजय वडेट्टीवार, कर्नाटकचे मंत्री आरबी तिम्मापूर आणि प्रियांका वाड्रा यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांचे नाव घेतले. भाजपा मुख्यालयात पत्रकार परिषदेत बोलताना प्रसाद यांनी कॉंग्रेस नेते राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांना सवाल विचारला की, त्यांचे अशा नेत्यांच्या वक्तव्यावर काही नियंत्रण आहे का?

“राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांचे त्यांच्या पक्षावर नियंत्रण नाही का? की दोघांनीही औपचारिक टिप्पण्या केल्या आणि इतरांना त्यांच्या मनाप्रमाणे बोलण्याचे स्वातंत्र्य दिले आहे?,” असा संतप्त सवाल रविशंकर प्रसाद यांनी उपस्थित केला आहे. शनिवारी, पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यावर भारताच्या प्रतिक्रियेबद्दल विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना सिद्धरामय्या म्हणाले की, युद्धाची गरज नाही. देशभर शांतता नांदली पाहिजे. केंद्राने लोकांचे रक्षण करण्यासाठी सुरक्षा बळकट करावी, असे ते म्हणाले होते. या टीकेनंतर, भाजपने सिद्धरामय्या यांना ‘पाकिस्तान रत्न’ असे संबोधणाऱ्या पाकिस्तानी माध्यमांच्या वृत्तांकडे लक्ष वेधले. त्यानंतर कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण जारी केले की, युद्ध हा नेहमीच शेवटचा उपाय असावा आणि शत्रूला पराभूत करण्याचे इतर सर्व मार्ग अपयशी ठरले तरच ते वापरले पाहिजे.

हे ही वाचा..

पाकिस्तानचे समर्थन अंगलट, तिघांना अटक

पाकिस्तानच्या नशिबात आता रडणे

ओवैसींनी केली पाकिस्तानची ‘आयएस’शी तुलना

युपीतून पाकिस्तानी नागरिकांना देशाबाहेर पाठवले

काँग्रेसचे आणखी एक ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी सोमवारी म्हटले की, “पहलगाम दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी सरकारने घ्यावी. तसेच दहशतवाद्यांना लोकांना त्यांच्या धर्माबद्दल विचारण्यासाठी इतका वेळ असतो का? काही लोक म्हणतात की हे घडलेच नाही. दहशतवाद्यांना कोणतीही जात किंवा धर्म नसतो. जबाबदार असलेल्यांना पकडा आणि कारवाई करा. ही देशाची भावना आहे,” असे वादग्रस्त विधान वडेट्टीवार यांनी केले होते. तर, कर्नाटकचे मंत्री आर.बी. तिम्मापूर यांनीही अशाच आशयाचे वक्तव्य करून वाद निर्माण केला होता. गोळीबार करणारा माणूस जात विचारेल की धर्म? तो फक्त गोळीबार करेल आणि निघून जाईल. व्यावहारिक विचार करा. तो तिथे उभा राहून विचारणार नाही आणि नंतर गोळीबार करणार नाही, असे वक्तव्य त्यांनी केले होते.

धर्मकारण सोडून राजकारण कशाला ? | Amit Kale | Shankaracharya Avimukteshwaranand | Narendra Modi |

Exit mobile version