काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्याकडे पुन्हा एकदा काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून धुरा सोपवण्यात यावी अशी मागणी युवक काँग्रेसकडून करण्यात आली आहे. युवक काँग्रेसच्या दोन दिवसीय राष्ट्रीय कार्यकारणी बैठकीत या संदर्भातला ठराव मंजूर करण्यात आला आहे. युवक काँग्रेस ही राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची युवक आघाडी आहे.
युवक काँग्रेसची दोन दिवसीय राष्ट्रीय कार्यकारणी बैठक दिल्ली येथे सुरु आहे.आठ आणि नऊ मार्च असे दोन दिवस चालणाऱ्या या बैठकीत राहुल गांधी यांना पुन्हा एकदा राष्ट्रीय अध्यक्ष बनवावे यासंदर्भातील ठराव मांडला गेला. हा ठराव एकमातने पारित करण्यात आला. “हा फक्त ठराव नसून प्रत्येक काँग्रेस कार्यकर्त्याचा आवाज आहे.” असे युवक काँग्रेसने म्हटले आहे.
हे ही वाचा:
या आधी दिल्ली काँग्रेस आणि छत्तीसगड काँग्रेसने आपल्या प्रदेश कार्यकारणी बैठकीत राहुल गांधी यांना अध्यक्ष करण्याबाबत ठराव पारित केला होता. सध्या सोनिया गांधी या काँग्रेस अध्यक्ष पदाची जबाबदारी पार पाडत असून लवकरच नव्या काँग्रेस अध्यक्षाची निवड होणे अपेक्षित आहे. पुढील दोन महिन्याच्या कालावधीत काँग्रेस पक्षात संघटनात्मक फेरबदल होऊ शकतात. देशात होऊ घातलेल्या पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ आणि पुदुचेरी या राज्यांच्या विधानसभा निवडणूका पार पडल्यानंतर काँग्रेसमध्ये नेतृत्व बदल होणार असल्याचे म्हटले जात आहे.