संसदेत प्रश्न विचारण्यासाठी महुआ मोइत्रा यांनी घेतली लाच?

भाजप खासदाराचा आरोप

संसदेत प्रश्न विचारण्यासाठी महुआ मोइत्रा यांनी घेतली लाच?

तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी संसदेत प्रश्न विचारण्यासाठी एका व्यावसायिकाकडून पैसे घेतल्याचा आरोप भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी केला आहे. या संदर्भात दुबे यांनी रविवारी लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहून मोइत्रा यांच्या विरोधात चौकशी समिती स्थापन करण्याची मागणी केली आहे.

महुआ मोइत्रा यांनी संसदेत प्रश्न विचारण्याच्या बदल्यात या व्यावसायिकाकडून पैसे आणि भेटवस्तूरूपात लाच घेतल्याचा आरोप दुबे यांनी केला आहे. या गंभीर प्रकरणात मोइत्रा यांना लोकसभेतून तातडीने निलंबित करावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

दुबे यांनी लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांना या संदर्भात दोनपानी पत्र लिहिले आहे. ‘जेव्हा जेव्हा संसदेचे अधिवेशन असते, तेव्हा मोहुआ मोईत्रा आणि सौगता रॉय यांच्या नेतृत्वाखालील अखिल भारतीय तृणमूल काँग्रेसच्या ‘ब्रिगेड’ला सभागृहाच्या कामकाजात व्यत्यय आणण्याची सवय आहे. ते कोणता ना कोणत्या कारणाने प्रत्येकाला सतत शिवीगाळ करतात,’ असे त्यांनी या पत्रात लिहिले आहे. महुआ यांनी लोकसभेत विचारलेले ६१ पैकी ५० प्रश्न अदानी ग्रुपवर लक्ष्य करणारे, त्यांच्यावर गैरव्यवहाराचा आरोप करणारे होते.

तृणमूल काँग्रेसनेत्यांच्या या ‘रणनिती’मुळे सामान्य लोकांच्या समस्या आणि सरकारची धोरणे यावर चर्चा करण्याच्या इतर सदस्यांच्या घटनात्मक अधिकारांचे उल्लंघन झाले आहे, याकडे भाजप नेत्याने लक्ष वेधले आहे. महुआ मोईत्रा यांनी लोकसभेत प्रश्न विचारण्याच्या बदल्यात व्यावसायिकाकडून पैसे घेऊन दुसर्‍या व्यावसायिक गटाला लक्ष्य केल्याचा आरोप दुबे यांनी केला. महुआ मोईत्रा यांना दिलेली ‘फायरब्रँड खासदार’ ही पदवी लबाडीशिवाय काही नाही, असेही ते म्हणाले.

हे ही वाचा:

ट्रकला आरटीओने महामार्गावर थांबवल्याचा व्हिडीओ समोर; दोन अधिकारी अटकेत

इस्रायलच्या हवाई हल्ल्यात हमासचा नुखबा फोर्सचा सर्वोच्च कमांडर ठार!

भवानी शक्तीपीठ हे संस्कारांचे उर्जा केंद्र

गोलंदाज एल. शिवरामकृष्णनने केले राजदीपला त्रिफळाचीत!

मोइत्रा यांनी फेटाळले आरोप

दुबेंच्या आरोपांना उत्तर देताना, महुआ मोइत्रा यांनी माझ्याविरुद्धच्या कोणत्याही प्रस्तावाचे स्वागतच असेल, अशी प्रतिक्रिया दिली, ‘विशेषाधिकारांचे एकापेक्षा जास्त उल्लंघन करणारे बनावट पदवीधर आणि भाजपच्या इतर दिग्गजांच्या विरोधात अनेक प्रकरणे प्रलंबित आहेत. सभापतींनी या सर्व प्रकरणांचा निपटारा केल्यास मी लगेचच माझ्याविरुद्धच्या कोणत्याही प्रस्तावाचे स्वागत करेन. तसेच, माझ्या दारात येण्यापूर्वी ईडीकडून अदानी कोळसा घोटाळ्यात केव्हा एफआयआर दाखल होईल, याची मी वाट पाहात आहे,’ अशी प्रतिक्रिया मोइत्रा यांनी ‘एक्स’वर दिली.

Exit mobile version