विरोधकांच्या ‘इंडिया’ आघाडीच्या बैठकीनंतर राज्यात भाजपा- शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्या महायुती सरकारची देखील बैठक पार पडली. यावेळी शिवसेना नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजपा नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांवर टीकास्त्र डागले.
इंडिया आघाडीतीन ३६ विरोधकांनी त्यांचा पंतप्रधान पदाचा उमेदवार सांगावा
“विरोधकांच्या माध्यमातून एकच गोष्ट चालली आहे ती म्हणजे मनधरणी करु शकणार नाही तर त्यांना गोंधळात टाका. पण एक गोष्ट निश्चितपणे समजून घ्यायला हवी. भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि सर्व मित्रपक्ष यांची फेविकॉलची जोड आहे ती अशीच तुटणार नाही,” असा सणसणीत टोला देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना लगावला आहे. “मुख्यमंत्री, मी आणि अजित पवार आमच्यात पूर्ण संवाद आहे. पूर्ण एका विचाराने आणि एका दिशेने आम्ही चाललो आहोत. सर्व निर्णय एकत्रितपणे घेत आहोत,” असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
“३६ विरोधक एकत्र आले आहेत. यापैकी अर्धे असे आहेत की, त्यांचं काही अस्तित्व नाही. यांना एकच प्रश्न आहे, तुमचा पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण आहे ते सांगा. आमच्या सर्वांचा उमेदवार नरेंद्र मोदी आहेत. ते आजही पंतप्रधान आहेत आणि उद्याही आहेत. पण इंडिया आघाडीने त्यांचे सांगावे,” असा खोचक सवाल फडणवीस यांनी उपस्थित केला आहे.
उद्धव ठाकरे पंतप्रधान पदाची शपथ ऑनलाईन घेणार की फेसबुकवरून घेणार
इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर उद्धव ठाकरेंना पंतप्रधानपदाचा चेहरा घोषित करण्याबाबत प्रश्न विचारला असता ते म्हणाले होते की, “जातो आता लगेच पंतप्रधानपदाची शपथ घेतो.” यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर देत त्यांच्यावर घाणाघाती टीका केली. पंतप्रधान पदाची शपथ कशी घेणार? ऑनलाईन घेणार की फेसबुकवरून घेणार? असा खोचक टोला एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे.
“नरेंद्र मोदींची बदनामी करण्याचं काम परदेशात जाऊन काही लोक करतात. खरंतर तोच देशद्रोह आहे. यूपीएचं नाव कायम ठेवायला त्यांना लाज वाटली. जे लोक एक लोगो बनवू शकत नाहीत, ते एकत्र कसे जोडले जाणार? पंतप्रधानपदावर एकमत होणं तर लांबची गोष्ट आहे. मग ते लोकांबरोबर कसे जोडले जातील?” असा तिखट सवाल एकनाथ शिंदेंनी उपस्थित केला. मुंबईत हवा आणि ध्वनी प्रदूषण वाढलंय. कारण गेल्या दोन दिवसांत इथल्या हवेत खोटारडेपणा आणि अहंकार मिसळला आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.
पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नेतृत्व फक्त देशाला नव्हे तर जगाला मान्य
“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व फक्त देशानेच नाही तर जगाने मान्य केलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचे राज्य निर्माण केले, त्याचप्रकारे सर्व धर्मियांसाठी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्य कारभार सुरू आहे. नरेंद्र मोदींच्या विकासाच्या वाटेवर चालण्याचा विचार केला आहे. नवी पहाट आणि नवी सुरूवात या विचाराने आपल्याला पुढे जायचे आहे. आगामी काळात राज्य आणि देशाच्या विकासासाठी एकत्र येऊन पंतप्रधान मोदींचे हात आम्ही मजबूत करणार आहोत,” असे गौरवोद्गार अजित पवार यांनी नरेंद्र मोदी आणि अजित पवार यांच्यासाठी काढले. नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या ‘वन नेशन वन इलेक्शन’ या निर्णयाचे अजित पवारांनी स्वागत केले आहे.
हे ही वाचा:
भारतात होणाऱ्या जी- २० परिषदेत शी जिनपिंग यांची अनुपस्थिती म्हणजे पळवाट?
जॉर्जियाकडून ऑक्टोबर महिना ‘हिंदू हेरिटेज मंथ’ म्हणून घोषित
विक्रम लँडरच्या सर्व उपकरणाचे काम संपले की नासाचे ‘एलआरए’चे ऍक्टिव्ह होईल
मुंबईतील प्रमुख रस्त्यांसोबतच गल्ल्यांमध्येही स्वच्छता मोहीम राबवावी
गेल्या काही दिवसांपासून मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा प्रयत्न सुरू असलेल्या चर्चांवर बोलताना अजित पवार म्हणाले की, “जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत कोणाचा बाप देखील मुंबईला महाराष्ट्रापासून तोडू शकत नाही. काही लोकांकडून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू आहे,” अशी भूमिका अजित पवारांनी मांडली.