राज्यात विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले असून राजकीय हालचालींना वेग आला आहे. महाविकास आघाडी आणि महायुती अशा दोन्ही आघाड्यांच्या गोटात सध्या जागा वाटपाच्या चर्चा सुरू असून महायुतीचे जागावाटप जवळपास पूर्ण झाले असून पहिली यादी कधीही जाहीर केली जाईल, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.
महायुतीच्या जागा वाटपांचा मुद्दा मार्गी लावण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची अमित शाह यांच्यासोबत दिल्लीत रात्री जवळपास अडीच तास बैठक झाली. शुक्रवारी (१८ ऑक्टोबर) रोजी रात्री दिल्लीत अमित शाह यांच्या घरी झालेल्या बैठकीला सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल हेही उपस्थित होते. या बैठकीत किती जागांचा तिढा सुटला, उमेदवार जाहीर करण्याबद्दल तिन्ही पक्षांचे काय ठरले आहे, याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली.
दिल्लीवरून देवेंद्र फडणवीस नागपूरला परतले. यावेळी नागपूर विमानतळावर माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, “जागावाटपासंदर्भातील आमची चर्चा अंतिम टप्प्यामध्ये आहे. शुक्रवारी भरपूर सरकारात्मक चर्चा होऊन जवळपास ज्या अडचणीच्या जागा होत्या त्यातील अर्ध्यापेक्षा जास्त जागांचे पेच सोडवले आहेत, थोड्याशा जागा शिल्लक आहेत,” अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
पुढे देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “दोन दिवसांत उर्वरित जागांचा पेच सोडवला जाणार. आमचं असं ठरलेलं आहे की, क्लिअर झालेल्या ज्या जागा आहेत, त्या प्रत्येक पक्षाने आपापल्या सोयीने घोषणा करायच्या. भाजपाची पद्धत आहे की, निवडणूक समिती, संसदीय मंडळ अशा आमच्या सगळ्या प्रक्रिया असतात. त्या जवळपास संपत आल्या आहेत. आमची पहिली यादी कधीही येऊ शकते, अशी परिस्थिती आहे. जागावाटप लवकरच सांगू,” अशी माहिती देत महायुतीची पहिली यादी कधीही जाहीर केली जाऊ शकते याचे सुतोवाच देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.
हे ही वाचा..
बहराइचमध्ये बुलडोझर कारवाईच्या नोटीसनंतर दुकानदारांकडून स्वतःचं बेकायदा बांधकाम पाडण्यास सुरुवात
जम्मू- काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याचा प्रस्तावाला नायब राज्यपालांची मंजुरी
एक धमकीचा संदेश आणि विमान कंपन्यांना करोडोंचे नुकसान
अभिनेत्री शामनाथच्या घरात आढळले अंमली पदार्थ
दरम्यान, अमित शाह यांच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधताना यावर भाष्य केले. “महायुतीच्या जागावाटपासंदर्भातील चर्चा अतिशय सकारात्मक झाली. चर्चा अंतिम टप्प्यात आहे. एक- दोन दिवसात सर्व जागावाटपाबाबत निर्णय होईल. तिढा एवढा जास्त राहिलेला नाही. आता ३०- ३५ जागांचा तिढा आहे,” अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.