महायुती अमित ठाकरेंना समर्थन देणार?

भाजपा आमदार आशिष शेलारांच्या विधानामुळे रंगल्या चर्चा

महायुती अमित ठाकरेंना समर्थन देणार?

विधानसभेची निवडणूक जाहीर होताच महाविकास आघाडी आणि महायुतीमधील सर्वच राजकीय पक्षांनी उमेदवार जाहीर करायला सुरुवात केली आहे. दरम्यान, विधानसभेच्या निवडणुकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांचे पुत्र अमित ठाकरे यांना पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरवले आहे. माहीम विधानसभा मतदारसंघामधून अमित ठाकरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

माहीममधून यंदा तिरंगी निवडणूक रंगण्याची शक्यता आहे. अमित ठाकरे यांच्यासह माहीम विधानसभा मतदारसंघामधून शिवसेनेकडून सदा सरवणकर आणि ठाकरे गटाकडून महेश सावंत यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र, यातच आता भाजपा नेते आशिष शेलार यांनी केलेल्या एका विधानामुळे या जागेवर चित्र पालटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अमित ठाकरे यांना समर्थन देण्याची भूमिका घेतली पाहिजे, असं विधान आशिष शेलार यांनी केलं आहे. त्यामुळे माहीममध्ये महायुती अमित ठाकरेंना पाठिंबा देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

“सदा सरवणकर यांना आमचा विरोध नाही. पण महायुती म्हणून सगळ्यांनी एक चांगली राजकीय भूमिका घ्यावी. त्यातून जनतेत एक संदेश जाईल. हिंदुत्वाची भूमिका घेणारे आम्हाला मदत करणारे आणि नातेसंबंध जपणारे राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे मैदानात उतरले असतील, तर आपणही नाते जपायला हवे. भले उद्धव ठाकरेंना वाटत नसेल तरी महायुतीने नाते जपावे,” असं आवाहन आशिष शेलार यांनी केलं आहे. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्याशी बोलणार असल्याचेही आशिष शेलार यांनी सांगितले.

हे ही वाचा : 

सचिन वाझेला दणका; माफीचा साक्षीदार होण्याचा अर्ज फेटाळला

जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यांनंतर लष्कर आणि पोलिसांच्या संयुक्त शोध मोहिमेला वेग

ठाकरे गटानंतर काँग्रेसचीही दुसरी यादी जाहीर; एकूण ७१ जागांवर दिले उमेदवार

पूर्व लडाखमधील डेपसांग आणि डेमचोकमध्ये लष्करी संरचना हटवण्यास सुरुवात

आशिष शेलार यांच्या विधानावर उदय सामंत म्हणाले की, “आशिष शेलार यांची भूमिका ही भाजपाची असू शकते. मात्र, यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार हे चर्चा करतील. कारण हा मोठा विषय आहे. राज ठाकरे यांचे चिरंजीव हे निवडणूक लढवत आहेत. त्याबाबत काय करायचं? याचा निर्णय हे महायुतीचे नेते चर्चा करून घेतील.”

Exit mobile version