आमचं सरकार फेसबुक सरकार नव्हे तर फेस टू फेस सरकार आहे, असा सणसणीत टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमात भाषण करताना उद्धव ठाकरेंना लगावला. शिर्डीजवळच्या काकडी गावात शासन आपल्या दारी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला.
बंद दाराआड बसून काम करणारे आमचे सरकार नाही. आमचे सरकार हे फेस टू फेस सरकार आहे. फेसबुक वरचे सरकार नव्हे, अशी सडकून टीका देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या मी पुन्हा येईन घोषणेवर भाष्य केले. २०१९ साली काही लोकांच्या बेईमानीमुळे मी येऊ शकलो नाही, असं फडणवीस म्हणाले.
राज्यात अनेक योजनांची प्रभावीपणे अंमलबजवणी सुरू आहे. मी म्हणालो होतो मी पुन्हा येईन, अजून देखील त्याची दहशत आहे. काही लोकांच्या बेईमानीमुळे मी येऊ शकलो नव्हतो. मात्र, ज्यांनी आमच्याशी बेईमानी केली त्यांचा संपूर्ण पक्ष घेऊन आलो आहोत, असा खोचक टोला फडणवीस यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसला लगावला आहे. आमची नजर खुर्चीवर आहे मात्र ती खुर्चीच्या संरक्षणासाठी आहे. कोणी आमच्या मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीकडे कोणी वाकड्या नजरेने पाहू नये, यासाठी आमचे लक्ष मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीकडे आहे, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
हे ही वाचा:
ताडदेव लूट तसेच वृद्धेच्या हत्येप्रकरणातील तीन आरोपींच्या मुसक्या आवळल्या
संरक्षणविषयक संसदीय स्थायी समितीवर राहुल गांधी
भारताकडून काहीतरी शिका, पाकिस्तानला चीनचा सल्ला!
आज लोकसभा निवडणुका झाल्यास कोण मारणार बाजी?
विकासकामांना पैसा कमी पडणार नाही. शेतकऱ्यांना मजबूत करण्याचे काम करत आहोत. त्यासाठी नमो शेतकरी सन्मान योजना, एक रुपयात पीक विमा योजना अशा अनेक योजना आणल्या आहे. दुर्दैवाने दुबार पेरणीची वेळ आली तर सरकार वाऱ्यावर सोडणार नाही. सरकार तुमच्या पाठीशी असणार आहे, असा विश्वास फडणवीसांनी यावेळी दिला.