विधान परिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी आणि भारतीय जनता पक्षाचे प्रत्येकी ४ उमेदवार जिंकून आले असले तरी महाविकास आघाडीची तब्बल २१ मते फुटल्याचे समोर आल्यामुळे सत्ताधारी ठाकरे सरकारमध्ये खळबळ उडाली आहे.
भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना एकूण १३३ मते पडल्यामुळे एकूण २० मते भाजपाला अतिरिक्त मिळाल्याचे स्पष्ट होते आहे. भाजपाच्या प्रवीण दरेकर, राम शिंदे, उमा खापरे, श्रीकांत भारतीय यांनी पहिल्या पसंतीची मते घेतच बाजी मारली तर शिवसेनेचे दोन्ही उमेदवार सचिन अहीर आणि आमशा पाडवी पहिल्याच फेरीत जिंकले,पण शिवसेनेची ३ मते फुटल्याचे समोर आले. कारण शिवसेनेच्या उमेदवारांना मिळून ५२ मते पडली. त्यामुळे ५५ पैकी तीन मते कुणाला गेली यावर आता चर्चा होणार आहे. काँग्रेसचीही अवस्था दारुण झाल्याचे दिसले. पहिल्या पसंतीची ठरल्या कोट्याप्रमाणेही मते काँग्रेसच्या चंद्रकांत हंडोरे आणि भाई जगताप यांना मिळाली नाहीत.
हे ही वाचा:
मक्कीला ग्लोबल टेररिस्ट म्हणून घोषित करणाऱ्या प्रस्तावावर चीनचा खोडा
काँग्रेसच्या सुबोधकांत सहाय यांचे पंतप्रधान मोदींबाबत अश्लाघ्य विधान
‘मोदींमुळे लोक गरिबीतून बाहेर येत आहेत’
अनिल परबांना उद्या ईडीसमोर चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश
राष्ट्रवादी काँग्रेसने मात्र अधिकच्या सहा मतांची कमाई केली. राष्ट्रवादीकडे ५१ आमदार असतानाही त्यांच्या रामराजे निंबाळकर, एकनाथ खडसे यांना मिळून ५७ मते मिळाली. ती कशी मिळाली याची चर्चा आता सुरू झाली आहे. एकूणच महाविकास आघाडीत राज्यसभा निवडणुकीत समन्वय नाही, हे स्पष्ट होत असताना आता विधान परिषद निवडणुकीतही महाविकास आघाडीत सारे काही आलबेल असल्याचे दिसले नाही. प्रतिक्रिया विचारताना एकनाथ खडसे, नाना पटोले यांनी आपल्या पक्षांच्या निवडणुकीतील स्थितीबद्दल सांगितले. महाविकास आघाडीबद्दल बोलण्यास ते तयार नव्हते.