लॉकडाऊनसाठी मविआच्या मंत्र्यांनी बांधले गुडघ्याला बाशिंग

लॉकडाऊनसाठी मविआच्या मंत्र्यांनी बांधले गुडघ्याला बाशिंग

ओमिक्रॉन या नव्या व्हेरियन्टचा प्रसार वाढत असल्यामुळे महाराष्ट्रात सध्या लॉकडाऊनबद्दल चर्चा सुरू झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अद्याप यासंदर्भात कोणतीही घोषणा केलेली नसली तरी महाविकास आघाडीतील मंत्री मात्र गुडघ्याला बाशिंग बांधून सज्ज आहेत. एकदा का लोकांना बंदिस्त केले की, आपण सुटलो असाच अविर्भाव अशा घोषणा करणाऱ्यांच्या वक्तव्यांमध्ये दिसून येतो. रोज एकेक नेता लॉकडाऊनबाबत संकेत देत आहे.

आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी नुकतेच असे स्पष्ट केले की, आपल्याला ७०० मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज भासू लागली की लॉकडाऊन लावला जाईल. तर आपत्ती व्यवस्थापन व अन्न पुरवठा मंत्री वडेट्टीवार यांनी पश्चिम बंगालप्रमाणे लॉकडाऊन लावले जाईल,अशी अनोखी घोषणा नुकतीच केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही लॉकडाऊन लावले जाईल, असे संकेत दिले आणि मंगळवारी त्यांनी सायंकाळी नव्या निर्बंधांबाबत बैठकही बोलावली. मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी २० हजारांवर रुग्णांची संख्या गेली तर लॉकडाऊन लावला जाईल, असे वक्तव्य केले. ज्यांचा तसा थेट याच्याशी संबंध नाही, त्या अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनीही लॉकडाऊन लावण्याची शक्यता व्यक्त केली. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनीही लॉकडाऊनबद्दल भाष्य केले. एकूणच महाविकास आघाडीतील मंत्री, नेते लॉकडाउनबाबत प्रचंड ‘पॉझिटिव्ह’ असल्याचे चित्र आहे.

हे ही वाचा:

‘जितेंद्र आव्हाड म्हणजे प्रस्थापितांना खूष करणारे कंत्राटी कामगार’

जागा दाखवणाऱ्या राष्ट्रवादीलाच कंद यांनी दाखविली जागा

‘दहशतवाद्याच्या नावाने रुग्णवाहिका चालू करणाऱ्याकडून दुसरी काय अपेक्षा?’

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कोरोनाची लागण

 

काही दिवसांपूर्वी राज्यातील विविध नेत्यांच्या घरी विवाहसोहळे पार पडले. त्या सोहळ्यांमध्ये नेत्यांच्या चेहऱ्यांवर मास्क नव्हते किंवा तिथेही गर्दीवर कोणतेही नियंत्रण नव्हते. त्यावेळी गर्दी करू नका असे आवाहन कोणत्याही नेत्याने केल्याचे दिसले नाही. महाविकास आघाडीतील शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या मुलीचे लग्न, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या मुलीचे लग्न पार पडले त्यात मोठ्या संख्येने गर्दी पाहायला मिळाली. कोरोनाच्या नियमांचे सर्रास उल्लंघन पाहायला मिळाले. आता मात्र हे लग्नसोहळे आटोपल्यावर लॉकडाऊनची चर्चा सुरू झाली की काय, असा प्रश्न लोक विचारत आहेत.

लॉकडाऊन लावण्याचे सर्वसामान्य जनतेवर काय परिणाम होतील, याचा कसलाही विचार न करता रोज एकेक नेता लॉकडाउनच्या घोषणा करत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे कारण देत मुंबईतील पहिली ते आठवीच्या शाळा ३१ जानेवारीपर्यंत बंद ठेवण्यात आल्या आहेत. आता उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी महाविद्यालयांबाबतही लवकरच निर्णय घेतला जाईल, असे म्हटले आहे. त्यामुळे लॉकडाऊन लावण्याच्या घोषणांबाबत महाविकास आघाडीच्या मंत्र्यांमध्ये प्रचंड चढाओढ असल्याचे दिसते आहे.

लॉकडाऊनच्या या रोज होणाऱ्या घोषणांमुळे जनसामान्यांमध्ये मात्र भीतीचे वातावरण आहे. लॉकडाऊन लागले तर नोकरीचे काय होणार, पुन्हा एकदा आर्थिक विवंचनेचा सामना करावा लागेल का, असे प्रश्न सामान्य जनतेच्या मनात निर्माण होत आहेत.

Exit mobile version