नुकत्याच पाच राज्यांमध्ये निवडणुका पार पडल्या. परवा आलेले निकाल सर्वांच्या समोरच आहेत, पुरेसे स्पष्ट आहेत. त्यावर फारसे भाष्य करण्याची गरजच नाही. कॉंग्रेसची सत्ता, (अर्थात कॉंग्रेसचे मुख्यमंत्री) सध्या देशातील फक्त दोन राज्यांत आहेत, राजस्थान आणि छत्तीसगड. याखेरीज, झारखंड, तामिळनाडू आणि महाराष्ट्रात कॉंग्रेस पक्ष ‘सत्ताधारी आघाडीचा केवळ एक सदस्य’ आहे. आता यापुढे कॉंग्रेसचे एकूण भवितव्य काय ? हा प्रश्न कोणत्याही विचारी नागरिकाला पडणे स्वाभाविक आहे. कारण स्वातंत्र्योत्तर ७५ वर्षांच्या प्रदीर्घ काळात कॉंग्रेसचा प्रवास नेहमीच – “सत्ता आणि सत्तेसाठी सर्व काही, किंबहुना सत्तेसाठी काहीही” – ह्या एकाच सूत्राने झालेला दिसतो. साहजिकच ‘सत्तेविना कॉंग्रेस’, ही कल्पनाच बहुतेकांना अतर्क्य, असंभवनीय वाटू शकते ! अशा परिस्थितीत, कॉंग्रेसच्या भवितव्याचा वेध घेण्याचा हा प्रयत्न –
महात्मा गांधीजींचे या संबंधी मौलिक चिंतन : याबाबतीत गांधीजींचे विचार अतिशय महत्वाचे आहेत, इतकेच नव्हे, तर त्यांच्या दूरदृष्टीचे खरेच आदरमिश्रित कौतुक वाटावे, अशी वस्तुस्थिती आहे. याचे कारण, त्यांनी २९ जानेवारी १९४८ रोजी (म्हणजे त्यांच्या दुर्दैवी मृत्युच्या केवळ एक दिवस आधी) यासंबंधी एक प्रकट चिंतन लिहून ठेवलेले आहे, जे – त्यांचे अखेरचे लेखन असल्यामुळे – जणूकाही त्यांचे ‘राजकीय इच्छापत्र व व्यवस्थापत्र’ (“His Last Will and Testament”) म्हणून ओळखले जाते. त्यांनी १ फेब्रुवारी १९४८ च्या “हरिजन” च्या अंकासाठी आधीच लिहून ठेवलेल्या मजकुराला हे
अखेरचे ‘मनोगत’ जोडलेले असून, त्यातील भावार्थ आणि तळमळ अतिशय हृद्य आहे. इथे त्यातील महत्वाचा भाग उद्धृत करणे, प्रासंगिक ठरेल. ते विचार असे :
(या पुढील भाग गांधीजींचे उद्धृत लेखन असून, संदर्भ शेवटी दिलेला आहे.)
“भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस” (Indian National Congress)
‘भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस’ ही सर्वात जुनी राष्ट्रीय राजकीय संघटना असून तिने अहिंसक मार्गाने असंख्य लढे देऊन अखेरीस देशाचे स्वातंत्र्य मिळवले असल्याने तिला मरू देऊन चालणार नाही. तिचा मृत्यू, म्हणजे राष्ट्राचा मृत्यू होय. एक जिवंत संघटना, ही नेहमीच, एकतर वाढते, अन्यथा मरते. कॉंग्रेसने राजकीय स्वातंत्र्य तर मिळवले; पण अजून तिला आर्थिक, सामाजिक व नैतिक स्वातंत्र्य मिळवायचे बाकी आहे. ही स्वातंत्र्ये मिळवणे विधायक स्वरूपाचे असल्याने, अधिक कठीण आहे. लोकशाही मार्गाने जात असताना, कॉंग्रेसमध्ये अगदी अपरिहार्यपणे काही अवांछित, भ्रष्ट बांडगुळे आणि अशा संस्था तयार झाल्या आहेत. ज्या केवळ नावापुरत्याच लोकांसाठी किंवा ‘लोकशाही’ आहेत.
हे ही वाचा:
सीताराम कुंटेंची हकालपट्टी करा
या गायिकेला पंकजा मुडेंनी घेतले दत्तक!
अशा नको त्या गोष्टींपासून कॉंग्रेसची सुटका कशी करावी ?
कॉंग्रेसने आपले सभासद नोंदणी रजिस्टर तात्काळ बंद करावे. यापुढे कॉंग्रेसचे सभासदत्व, हे देशातील सर्व स्त्री पुरुष मतदारांना सामावून घेणारे असावे. सभासद याद्यांत कोणाही बोगस सदस्याचे नाव घुसडले जाणार नाही आणि कोणाही खऱ्या मतदाराचे नाव वगळले जाणार नाही , याची काळजी कॉंग्रेसला घ्यावी लागेल. कॉंग्रेसचे सदस्य हे यापुढे असे ‘लोकसेवक’ असतील, जे वेळोवेळी त्यांना नेमून दिले गेलेले कार्य चोखपणे पार पाडतील. सध्या जरी असे कार्यकर्ते शहरी भागातून घेतले गेले, तरी त्यांना मुख्यतः खेड्यातील लोकांसाठी, स्वतः खेड्यात राहूनच काम करावे लागेल. भविष्यात असे कार्यकर्ते अधिकाधिक संख्येने खेड्यातूनच आलेले असतील. हे लोकसेवक, आपापल्या कार्यक्षेत्रातील सर्व कायदेशीर नोंदणी झालेल्या मतदारांची प्रामाणिकपणे सेवा करतील. अनेक पक्ष / संघटना त्यांना आपल्याकडे ओढून घेण्याचा प्रयत्न करतील. त्यांनी स्वेच्छेने कुठल्याही चांगल्या संघटनेत किंवा पक्षात जावे. अशा तऱ्हेनेच कॉंग्रेसला तिची ओसरत चाललेली विश्वासार्हता परत मिळवता येईल. कालपर्यंत कॉंग्रेसचे कार्यकर्ते ‘राष्ट्राचे सेवक’ किंवा ‘खुदा इ खिदमतगार’ म्हणून ओळखले जात. आता यापुढे कॉंग्रेसने असे घोषित करावे की कॉंग्रेस कार्यकर्ते हे केवळ ‘ईश्वर – सेवक’ म्हणूनच राहतील, इतर काहीही नाही. सत्तेसाठी हपालेल्यांच्या स्पर्धेत जर कॉंग्रेस उतरली, तर एक दिवस तिचा अंत अटळ आहे.
मला जाणीव आहे, की मी पुष्कळ दूरच्या भविष्याचा वेध घेत आहे. जर मला पुरेसा वेळ मिळाला, आणि प्रकृतीने साथ दिली, तर मी ह्या स्तम्भांतून (‘हरिजन’ च्या) ‘लोकसेवकां’नी सर्व जनतेची सेवा कशी करावी, याविषयी चर्चा, मार्गदर्शन करीन. — (‘हरिजन’ च्या दि. १ फेब्रुवारी १९४८ च्या अंकासाठी गांधीजींनी लिहून ठेवलेले टिपण)
महात्मा गांधींचे अखेरचे इच्छापत्र / व्यवस्थापत्र (His Last Will and Testament)
आता आपण त्यांनी २९ जानेवारी १९४८ रोजी – म्हणजे मृत्युपूर्वी केवळ एक दिवस आधी – लिहून ठेवलेल्या त्या प्रसिद्ध उताऱ्यातील महत्वाचा भाग बघू : (महात्मा गांधीजींचे उद्धृत टिपण) –
“दोन भागांत फाळणी होऊन का होईना, पण देशाला राजकीय स्वातंत्र्य मिळवून देण्यात कॉंग्रेस यशस्वी झालेली असल्याने, आता सध्याच्या स्वरुपात कॉंग्रेसचे अस्तित्व (एक प्रचारसाधन आणि संसदीय पक्ष संघटना म्हणून) कालबाह्य झालेले आहे. भारताला अजूनही सामाजिक, नैतिक आणि आर्थिक स्वातंत्र्य मिळवणे बाकी आहे. विशेषतः आपल्या सात लाख खेड्यांचा विचार केल्यास ही गोष्ट कोणालाही निश्चितच पटेल. लोकशाहीचे अंतिम ध्येय गाठण्यासाठी सैनिकी सामर्थ्याकडून नागरी प्रभुत्वाकडे जाताना संघर्ष करावाच लागेल. त्यामध्ये कॉंग्रेसला राजकीय पक्ष आणि जातीय संघटनांच्या अनिष्ट सत्तास्पर्धेपासून कटाक्षाने दूर ठेवावे लागेल.
या आणि अशा इतरही कारणांमुळे अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटी (A.I.C.C.) असा ठराव करत आहे की – कॉंग्रेस संघटना सध्याच्या स्वरुपात विसर्जित करण्यात येऊन तिच्या जागी “लोक सेवक संघ” या नावाची नवीन संघटना अस्तित्वात यावी. या नव्या संघटनेचे सदस्य (लोकसेवक) खाली नमूद केलेल्या नियमांनुसार कार्य करतील. –
हे ही वाचा:
सीताराम कुंटेंची हकालपट्टी करा
काँग्रेस नेतृत्वावर ‘जी-२३’ क्षेपणास्त्राचा मारा
या गायिकेला पंकजा मुडेंनी घेतले दत्तक!
हिजाब प्रकरणी न्यायालयाच्या निर्णयाविरोधात आज मुस्लीम संघटनांचा ‘कर्नाटक बंद’
“लोकसेवक संघ” या प्रस्तावित संघटनेच्या सदस्यांसाठी गांधीजींनी तयार केलेले दहा नियम :
१. प्रत्येक लोकसेवक हा नेहमी खादीची वस्त्रे वापरणारा, आणि मद्य आदि मादक पदार्थांचे सेवन न करणारा असावा. जर तो हिंदू असेल, तर (तो व त्याचे इतर कुटुंबीय सुद्धा) कुठल्याही स्वरुपात अस्पृश्यता न पाळणारा, जातीजातींत उच्चनीचता न मानणारा तसेच सर्व जाती धर्मांचा सारखाच आदर राखणारा व सर्वाना समान संधी व प्रतिष्ठा देणारा असावा.
२. आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व खेड्यांतील रहिवाश्यांशी त्याचा वैयक्तिक संपर्क असावा.
३. त्याने खेड्यातील कार्यकर्त्यांना प्रशिक्षित करावे. यासाठी एका रजिस्टरमध्ये व्यवस्थित तपशीलवार नोंदी ठेवाव्यात.
४. त्याने आपल्या स्वतःच्या कार्याच्याही नोंदी व्यवस्थित दैनंदिनी (डायरी) मध्ये ठेवाव्यात.
५. शेती आणि हस्तोद्योग यांच्या माध्यमातून खेडी स्वयंपूर्ण आणि आत्मनिर्भर होतील, या दृष्टीने लोकसेवकांनी प्रयत्न करावेत.
६. शारीरिक स्वच्छता आणि सार्वजनिक आरोग्य यांचे योग्य शिक्षण खेडुतांना देऊन अनारोग्य व साथीचे आजार यांपासून खेडी मुक्त राहतील, असे प्रयत्न असावेत.
७. “हिंदुस्थानी तालिमी संघ” यांनी तयार केलेल्या धोरणानुसार – अर्थात “नयी तालीम” मधील सूत्रांनुसार – खेडुतांना जन्मापासून मृत्युपर्यंत योग्य शिक्षण दिले जाईल असे पहावे.
८. ज्या खेडूतांची नावे कायदेशीर मतदार याद्यांतून चुकीने वगळली गेली असतील, त्यांची नावे याद्यांत
टाकली जातील, हे लोकसेवकाने बघावे.
९. ज्यांचा कायदेशीर नागरिकत्वाचा हक्क अजून मिळालेला नाही अशांना (निर्वासितांना) तो प्राप्त करून घेण्यासाठी आणि मतदानाचा हक्क मिळवण्यासाठी लोकसेवक मदत करतील.
१०. वरील उद्दिष्टे, आणि भविष्यात वेळोवेळी ठेवली जाणारी इतर उद्दिष्टे यांच्या पूर्ततेसाठी, संघाने आखलेल्या नियमांनुसार, लोकसेवक स्वतःला योग्य रीतीने प्रशिक्षित ठेवील.
“लोकसेवक संघ”, हा स्वतःला “गोसेवा संघ”, “हिंदुस्थानी तालिमी संघ”, “हरिजन सेवक संघ”, …..इत्यादी
संस्थांशी संलग्न ठेवील.
लोकसेवक संघ आपल्या ध्येयपूर्तीसाठी आवश्यक असलेली वित्तीय साधने, ही मुख्यत्वे खेड्यापाड्यातील लोकसहभागातून, देणग्यांमधून उभी करेल, आणि त्यातही मुख्य भर हा गरिबांकडून जमवलेल्या लहान लहान देणग्यांवर असेल.
(संदर्भ : “इंडिया ऑफ माय ड्रीम्स” – महात्मा गांधी, संकलक आर के प्रभू, नवजीवन पब्लिशिंग हाउस, अहमदाबाद. प्रकरण ७०, पृष्ठ २९५ ते २९९)
हे अगदी उघड आहे, की स्वातंत्र्यप्राप्तीनंतर, कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी गेल्या ७५ वर्षांत, गांधीजींच्या वरील विचारांनुसार काहीही कुठेही केलेले नाही. आता कॉंग्रेसकडून एवीतेवी सत्ता जवळजवळ गेलेलीच आहे. निदान आता तरी कॉंग्रेसने आपल्या महान नेत्याचे, त्यांच्या विचारांचे स्मरण करून, कॉंग्रेसचे “राजकीय पक्ष” म्हणून विसर्जन – जे त्यांना जानेवारी १९४८ मध्येच अभिप्रेत होते, – ते करण्याचे नैतिक धैर्य, प्रामाणिकपणा दाखवावा. देशासाठी खरेच काही करण्याची इच्छा ज्या कॉंग्रेस कार्यकर्त्यांत असेल, त्यांनी गांधीजींच्या वरील विचारांनुसार खेड्यांत जाऊन प्रामाणिकपणे कार्य करावे. महात्मा गांधीजींना तीच खरी आदरांजली ठरेल.
– श्रीकांत पटवर्धन