महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन संपत असतानाच आता अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या बाबतीतली एक मोठी बातमी पुढे आली आहे. महाराष्ट्र सरकारचे अर्थसंकल्पीय अधिवेशन यंदा मुंबई ऐवजी नागपूरला होणार आहे. २८ फेब्रुवारी रोजी या अधिवेशनाला सुरुवात होईल. राज्याच्या दृष्टीने महत्वाचा असणारा वार्षिक अर्थसंकल्प या अधिवेशनात सादर केला जाणार आहे.
दर वर्षी राज्याचे हिवाळी अधिवेशन नागपूरला होत असते. पण यंदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रकृतीच्या कारणामुळे हिवाळी अधिवेशन नागपूर ऐवजी मुंबईत घेण्यात यावे असा प्रस्ताव सरकारने ठेवला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लांबचा प्रवास न करण्याचा वैद्यकीय सल्ला देण्यात आल्यामुळे ते नागपूरच्या अधिवेशनाला उपस्थित राहू शकत नाहीत. त्यामुळे हिवाळी अधिवेशन नागपूर एवजी मुंबई घ्यावे तसेच सरकारी पक्षाने प्रस्तावित केले. विरोधी पक्षानेही सामंजस्य दाखवत त्याला मान्यता दिली. पण त्याचवेळी आगामी अधिवेशन म्हणजेच अर्थसंकल्पी अधिवेशन हे मुंबई ऐवजी नागपूरला घ्यावे अशी भूमिका विरोधी पक्षाने मांडली. सरकारने सातत्याने विदर्भाकडे दुर्लक्ष करू नये असा सूर विरोधी पक्षाचा होता. विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना सरकारकडे आगामी अधिवेशन नागपूरला घेण्याबाबत दिलेल्या प्रस्तावाची माहिती दिली.
हे ही वाचा:
अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी होणार विधानसभा अध्यक्षांची निवड?
ब्राह्मोस क्षेपणास्त्राचा वापर भारतविरोधी राष्ट्रांवर वचक ठेवण्यासाठी
गुन्हेगारांना पकडताना पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश किरकोळ जखमी
महात्मा गांधी अवमानप्रकरणी कालीचरण महाराजांवर गुन्हा
त्यानुसारच आता महाराष्ट्र शासनाचे आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशन हे मुंबई ऐवजी नागपूरला घेण्यात येणार आहे. त्यामुळे यावेळी राज्याचा अर्थसंकल्प हा राज्याची राजधानी असलेल्या मुंबई ऐवजी उपराजधानी असलेल्या नागपूर मधून सादर केला जाणार आहे.