महाराष्ट्र अमेरिकेसोबत वाणीज्यिक संबंध दृढ करणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विश्वास

महाराष्ट्र अमेरिकेसोबत वाणीज्यिक संबंध दृढ करणार

अमेरिकेचे भारतातील राजदूत एरिक गारसेट्टी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज, १६ मे रोजी सह्याद्री अतिथीगृह येथे भेट घेतली. राज्यात कृषी, पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य या क्षेत्रात मोठी संधी असून अमेरिकेने या क्षेत्रात सहकार्य करावे. अमेरिकेसोबत महाराष्ट्राचे वाणिज्यिक संबंध अधिक दृढ करण्यासाठी सहकार्य करण्यात येईल, असे यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

हॉलिवूडमधील व्यक्तिमत्वाचे बॉलिवूडमध्ये स्वागत आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गारसेट्टी यांचे स्वागत केले. भारत- अमेरिका दोन्ही देशांमध्ये व्यापार, गुंतवणूक, संपर्क क्षेत्रात वाणिज्यिक संबंध आहेत. थेट परकीय गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र देशात अग्रेसर असून राज्यातील कृषी, आरोग्य, शिक्षण, पायाभूत सुविधा क्षेत्रात गुंतवणुकीची संधी असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. बदलते हवामान हे शेती क्षेत्रासमोर मोठे आवाहन असून त्यासाठी अमेरिकेने तांत्रिक सहकार्य करण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले. यावेळी मुंबईत सुरू असलेले विविध प्रकल्प, महिला सक्षमीकरण, बचत गटांची चळवळ आदीबाबत चर्चा झाली.

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमध्ये जी २० देशांच्या बैठका सुरू आहेत. त्यासाठी मुंबई महानगरी सजली असून सुमारे एक हजारांहून अधिक ठिकाणी सौंदर्यीकरणाचे प्रकल्प सुरू असल्याचे मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी सांगितले. मुंबईत रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाला सुरूवात झाली असून दोन वर्षांत मुंबई खड्डेमुक्त करण्याचा मानस असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

हे ही वाचा:

‘नाट्यनिवडणुकीची दुसरी गोष्ट’चे दणदणीत यश, प्रशांत दामले विजयी

सीबीआयने बेनामी संपत्तीवाल्यांच्या आणले नाकी ‘नऊ’

अतुल खिरवडकर राष्ट्रीय नागरी सहकारी वित्त व विकास महामंडळाचे सीईओ

नवी ‘केरळ स्टोरी’; तरुणीने मदरशात लावून घेतला गळफास

अमेरिकन राजदूतांना आवडला वडापाव

बैठकीच्या वेळी शिष्टमंडळासाठी देण्यात आलेल्या अल्पोपहारामध्ये राज्यातील विविध पदार्थांचा समावेश होता. एरिक गारसेट्टी खवय्ये असल्याने खासकरून मुंबईची ओळख असलेला वडापावदेखील दिला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अमेरिकन राजदूत गारसेट्टी यांना वडापाव खाण्याचा आग्रह केला. मुख्यमंत्र्यांनी केलेला आग्रह स्वीकारत गारसेट्टी यांनी वडापाव खाल्ला आणि पदार्थ आवडल्याची प्रतिक्रियाही दिली.

Exit mobile version