मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी अनलॉक विषयी वादग्रस्त टिप्पणी केली आहे. ५०% लसीकरण होईपर्यंत अनलॉक करता येणार नाही असं ते म्हणाले आहेत. यावर मुंबई भाजपाने त्यांच्यावर निशाणा साधला आहे. “अनेक महिने महाराष्ट्रात लॉकडाऊन ठेवणार का?” असा प्रश्न मुंबई भाजपने उपस्थित केला आहे.
“महाराष्ट्राचे मंत्री अस्लम शेख म्हणतात की राज्यात ५० टक्के लसीकरण पूर्ण झाल्यावरच लॉकडाऊन हटवता येऊ शकतो. एका बाजूला राज्य सरकार लसींची खरेदी करत नाहीये आणि दुसऱ्या बाजूला असे अनेक महिने महाराष्ट्रात लॉकडाऊन ठेवणार का? ते देखील जनतेला कोणतंही पॅकेज न देता?” असे ट्विट महाराष्ट्र भाजपाने केले आहे.
महाराष्ट्राचे मंत्री @AslamShaikh_MLA म्हणतात की राज्यात 50 टक्के लसीकरण पूर्ण झाल्यावरच लॉकडाऊन हटवता येऊ शकतो. एका बाजूला राज्य सरकार लसींची खरेदी करत नाहीये आणि दुसऱ्या बाजूला असे अनेक महिने महाराष्ट्रात लॉकडाऊन ठेवणार का? ते देखील जनतेला कोणतंही पॅकेज न देता? pic.twitter.com/NTnNeA8NNY
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) May 26, 2021
अस्लम शेख म्हणाले की, “जोपर्यंत मुंबई शहर आणि महाराष्ट्रात ५० टक्के लसीकरण होत नाही, तोपर्यंत लॉकडाऊनमध्ये कोणताही दिलासा देणं हे कोरोनाला आमंत्रण देण्यासारखं आहे. त्यामुळे सध्या लॉकडाऊनमध्ये कसा दिलासा देता येईल, काय नियम असतील, कोणत्या दुकानांना परवानगी देता येईल याचा विचार सुरु आहे. टास्क फोर्स याबाबत सूचना करतील. त्यानंतर कॅबिनेटमध्ये योग्य तो निर्णय घेऊन, यासंदर्भात घोषणा केली जाईल.” महाराष्ट्रात लसीकरणाबाबत गोंधळाचे वातावरण आहे. आता ४५ वयावरील व्यक्तींनाच लसी दिल्या जात आहेत. अशा परिस्थितीत हे ५० टक्के लसीकरण कधी होणार आणि अनलॉकची प्रक्रिया कधी सुरू होणार असा प्रश्न नागरिकांच्या मनात उपस्थित होत आहे.
हे ही वाचा:
शिवसेना नेत्याने लॉकडाऊनचे नियम पायदळी तुडवले
उजनीचा पाणी प्रश्न पेटला, जयंत पाटलांच्या पुतळ्याचे दहन
चार दिवसानंतर देशातील कोरोना रुग्णसंख्येत किंचित वाढ
दरम्यान, कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्यानं वाढ होत असल्यामुळे राज्यात लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. लॉकडाऊनचा सकारात्मक परिणाम दिसून येत आहे. अशातच राज्यातील वाढत्या रुग्णसंख्येचा आलेख आता उतरणीला लागल्याचं पाहायला मिळत आहे. सध्या राज्यात १ जून सकाळी ७ वाजेपर्यंत कडक निर्बंधांसह लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. परंतु, १ जूननंतर लॉकडाऊन वाढणार की निर्बंध हटवणार याबाबत कमालीची उत्सुकता आहे.