महाराष्ट्रात राज्य सरकार विरुद्ध राज्यपाल हा संघर्ष काही नवा नाही. महाराष्ट्र विकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून त्यांचा आणि राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्यातले संबंध अनेकदा ताणले गेल्याचे महाराष्ट्राने पाहिले आहे. याचाच एक नवा अध्याय सुरु होण्याची शक्यता आहे आणि त्यासाठी कारण ठरणार आहे विधानसभेच्या अध्यक्षांची निवड.
महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्राच्या विधानसभा सचिवालयाला पत्र पाठवले आहे. बजेट सत्राच्या आधी महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षांची निवड व्हावी असे या पत्रात म्हटले आहे. महाराष्ट्र विधानसभेचे माजी अध्यक्ष नाना पटोले यांनी राजीनामा देऊन महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पद स्विकारले आहे. त्यामुळेच सध्या महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष पद रिक्त आहे.
गेल्या काही दिवसांत महाराष्ट्र सरकार आणि राज्यपाल यांचे संबंध ताणल्या गेल्याच्या काही घटना घडल्या आहेत. राज्यपाल कोश्यारी काही दिवसांपूर्वी उत्तराखंडला जायला निघालेले असताना त्यांना सरकारी विमान वापरायची परवानगी राज्य सरकारने दिली नव्हती. त्यामुळे राज्यपालांना एका खासगी विमानाने प्रवास करावा लागला होता. तर राज्यपाल नियुक्त विधान परिषदेच्या बारा आमदारांची नियुक्ती राज्यपालांमार्फत अजूनही करण्यात आलेली नाही. या घटनांच्या पार्श्वभूमीवर राज्यपालांचे हे पत्र म्हणजे नव्या वादाची नांदी ठरते का? यावर सगळ्यांच्याच नजरा आहेत.