आरोग्य विभागाच्या महाभरतीचा महागोंधळ!

आरोग्य विभागाच्या महाभरतीचा महागोंधळ!

महाराष्ट्र सरकारच्या आरोग्य विभागात होणाऱ्या महाभरतीचा महागोंधळ ठाकरे सरकारने घालून ठेवला आहे. शनिवार आणि रविवार या दोन दिवस होणाऱ्या आरोग्य विभागाच्या परीक्षा ऐनवेळी पुढे ढकलण्यात आल्या आहेत. बाह्यस्त्रोत संस्था ‘न्यासा’ च्या अकार्यक्षमतेमुळे ही परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचे राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले आहे. तर अचानच परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतल्यामुळे परीक्षार्थी ठाकरे सरकार विरोधात संताप व्यक्त करताना दिसत आहेत.

राज्याच्या आरोग्य विभागातील गट क आणि गट ड मधील जागांसाठी २५ आणि २६ सप्टेंबर रोजी भरती परीक्षा होणार होती. पण शुक्रवार २४ सप्टेंबर रोजी अचानक ही परीक्षा रद्द करण्यात आल्याचे सरकारमार्फत सांगण्यात आले. या परीक्षेची जबाबदारी ‘न्यासा’ या बाह्य स्त्रोत संस्थेकडे देण्यात आली होती. पण त्यांच्या अकार्यक्षमतेमुळे परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचे सरकारमार्फत सांगण्यात येत आहे.

हे ही वाचा:

… म्हणून ठाण्यात भरले खड्ड्यांचे प्रदर्शन!

पाकिस्तान, तात्काळ पीओके सोडा!

अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रीपदाप्रमाणेच ऑलिम्पिक संघटनेत दोन-दोन वर्षे खजिनदार

अनिल परब ईडी समोर येणार?

 

याविषयी बोलताना राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणाले की “आरोग्य विभागातील क आणि ड वर्गातील जागांसाठी होणारी परीक्षा रद्द करावी लागली आहे. त्यामुळे परीक्षार्थींना जो त्रास झाला त्याबद्दल मी माफी मागतो आणि सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो. याच वेळी सरकारने सर्व खापर ‘न्यासा’ कम्युनिकेशन या बाह्य स्रोत संस्थेवर फोडण्याचा प्रयत्न केला. ‘न्यासा’ ही संस्था असमर्थ ठरल्याने भरती परीक्षा रद्द करून पुढे ढकलावी लागत आहे असे टोपे यांनी नमूद केले. तर येत्या आठ ते दहा दिवसांत परीक्षेच्या तारखा निश्चित करून जाहीर करण्यात येतील असेही त्यांनी सांगितले.

राज्यातील लाखो विद्यार्थी या परीक्षेकडे नजर लावून बसले होते. आरोग्य विभागातील तब्बल ६ हजार २०० जागांसाठी ही परीक्षा होणार होती. परीक्षा केंद्रांच्या गोंधळामुळे आणि हॉल तिकीटच्या गोंधळामुळे आधीपासूनच ही परीक्षा वादाच्या भोवऱ्यात अडकली होती. तर त्यात आता परीक्षाच रद्द केल्यामुळे सरकार विरोधात संतापाची लाट उसळलेली दिसत आहे अनेक विद्यार्थी हे परीक्षेच्या ठिकाणी जाऊन पोहोचले होते. पण अशी तडकाफडकी परीक्षाच रद्द करण्यात आल्यामुळे त्यांना प्रचंड मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे.

Exit mobile version