महाराष्ट्रातील सत्ताधार्यांच्या आदेशानेच पोलिसांची गुंडगिरी सुरू आहे असा घणाघात भारतीय जनता पार्टीचे नेते आमदार अतुल भातखळकर यांनी केला आहे. जालन्यामध्ये एका तरुणाला पोलिसांनी केलेल्या अमानुष मारहाणीचा व्हिडिओ गुरुवारी समाज माध्यमांवर व्हायरल झाला. हा व्हिडिओ बघून समाजातून या अमानवी कृत्याचा निषेध व्यक्त केला जात आहे. यावरूनच आमदार अतुल भातखळकर यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.
जालन्यात पोलिसांनी तरुणाला केलेल्या मारहाणीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये पोलीस एका युवकाला बेदम मारहाण करताना दिसत आहेत. नातेवाईकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यामुळे रुग्णालयाची तोडफोड केल्यामुळे या युवकाला पोलिसांनी चोप दिल्याचा दावा केला जात आहे. हा तरुण भाजपा कार्यकर्ता शिवराज नारियलवाला असल्याची माहिती समोर आली आहे.
हे ही वाचा:
मराठा आरक्षणावर दहा मिनिटांत सकारात्मक चर्चा?
ठाकरे सरकारमध्ये शिवसेनाच नाराज?
भाजपाचा शिवसेनेला ‘दे धक्का’, माथेरानमध्ये १० नगरसेवक फोडले
ग्लोबल टेंडरच्या नावावर लस घोटाळा?
हा व्हीडिओ ९ एप्रिलचा आहे. दर्शन देवावले नामक एका तरुणाचा अपघात झाल्यानंतर त्याला जालना शहरातील दीपक हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल केले होते. पण उपचारा दरम्यानच दर्शन देवावले याचा मृत्यू झाला. दर्शनच्या मृत्यूनंतर संतापलेल्या नातेवाईकांनी दीपक हॉस्पिटलमधील आयसीयू वॉर्डची तोडफोड केली होती. त्यातच शिवराज देखील असल्याचे सांगितले जात आहे. यावरूनच शिवरायला पोलिसांनी मारहाण केल्याचे सांगण्यात येत आहे. पण अशाप्रकारे कोणाला मारहाण करण्याचा अधिकार पोलिसांना नसून दोषींना शिक्षा देण्याचा अधिकार हा सर्वस्वी न्यायालयाचा आहे. त्यामुळे प्रशासनावर चांगलेच ताशेरे ओढले जात आहेत.
हा मारहाणीचा व्हिडिओ ट्विट करत भाजपा नेते अतुल भातखळकरांनी ठाकरे सरकारवर टीकास्त्र टाकले आहे. अशी अमानुष मारहाण करण्याचा अधिकार पोलिसांना कोणी दिला? असा सवाल भातखळकर यांनी विचारला आहे. तर या राज्यात न्यायव्यवस्था नावाची चीज शिल्लक आहे का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे तर सत्ताधार्यांच्या आदेशाने पोलिसांची गुंडगिरी सुरू आहे अशी तोफ भातखळकर यांनी डागली आहे.
ही घटना जालन्यातली. पोलीस स्टेशनमध्ये पोलिस ज्याला काठ्या तुटेपर्यंत गुरासारखे बडवतायत तो गुंड नसून एक सामान्य तरुण आहे.
अशी अमानुष मारहाण करण्याचा अधिकार पोलिसांना कोणी दिला? या राज्यात न्याय व्यवस्था नावाची चीज शिल्लक आहे का?सत्ताधाऱ्यांच्या आदेशाने पोलिसांची गुंडगिरी सुरू आहे. pic.twitter.com/HZfCb2DS67— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) May 27, 2021