राज्यभरात पावसानं थैमान घातलं आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. राज्यात कोल्हापूर, अकोला, परभणीसह अनेक ठिकाणी पूरस्थिती असून अनेक घरं पाण्याखाली गेली आहेत. पुढील पाच दिवस मुंबईसह राज्यभरात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोकणात गेल्या ४ दिवसांपासून पावसाचं रौद्र रूप पाहायला मिळत आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केंद्र सरकार हेलिकॉप्टरसह सर्व मदत करेल असं आश्वासन दिलं आहे. त्याचबरोबर राणे यांनी राज्य सरकार पूरस्थिती हाताळण्यात पूर्णपणे अपयशी ठरल्याचं म्हटलंय. राज्याला ड्रायव्हर नको तर लोकांचं हित पाहणारा चांगला मुख्यमंत्री हवा आहे, अशा शब्दात राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय.
जवळपास ३५० मिमी पाऊस झाल्याचा अंदाज आहे. हेलिकॉप्टर, बोटीने लोकांना काढणं, अन्न पुरवठा करणं, त्यांना सुरक्षितस्थळी नेणं हे काम सरकारनं केलं पाहिजे. मी केंद्रीय मंत्री नित्यानंतर रॉय यांच्याशी बोललो आहे. त्यांनी आश्वासन दिलं आहे की मी सगळी व्यवस्था करतो. गरज भासल्यास आपण अमित शाह यांच्याशीही बोलणार असल्याचं राणे म्हणाले. रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकाऱ्यांशी बोलणं झाल्याची माहिती राणे यांनी दिलीय.
अचानक मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याचं राज्य सरकारकडून सांगितलं जात आहे. मात्र ३०० मिमी पाऊस हा ४८ तासातील आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस अचाकन पडू शकत नाही. राज्य सरकारला कुठल्याही गोष्टीचं गांभीर्य नाही. कोकणात लोकांचा जीव धोक्यात येतो आणि साधी बोटींची तरतूदही करता येत नाही का? असा सवाल राणेंनी केलाय. राज्याच्या मुख्यमंत्र्यांना गांभीर्य आहे का? असा प्रश्न पडतो, असंही राणे म्हणाले.
हे ही वाचा:
संरक्षण क्षेत्रात मोदी सरकारकडून ‘ही’ नवी सुधारणा
मुख्यमंत्री स्वत: गाडी चालवत कोकणच्या दिशेने निघाले का?
लडाखच्या विकासासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय
गाडी चालवत पंढरपूरला गेले, पण दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या लोकांकडे, त्यांच्या कुटुंबियांकडे पाहण्यासाठी त्यांना वेळ नाही. राज्याला ड्रायव्हर नको आहे. राज्य सरकारकडे असे अनेक ड्रायव्हर आहेत. राज्याला चांगला, लोकांचं हित पाहणारा मुख्यमंत्री हवा आहे. मंत्रालयात जायचं नाही, कॅबिनेटला जायचं नाही आणि गाडी चालवत पंढरपूरला जायचं यात काय भूषण आहे, असा खोचक टोलाही राणे यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला आहे.