देशात कोविडमुळे होणारे मृत्यू झपाट्याने कमी होतायत, परंतु या सकारात्मक बातमीची काळी किनार म्हणजे अजूनही देशात होणारे मृत्यूपैकी ४१ टक्के मृत्यू महाराष्ट्रात होतायत हे आहे वसूली सरकारचे महाराष्ट्र मॉडेल जोडे मारण्याच्या लायकीचे, असे म्हणत भाजपा नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी ठाकरे सरकारवर टीका केलेली आहे.
देशातील सर्वाधिक मृत्यू हे महाराष्ट्रात झाल्याची टीका नुकतीच देवेंद्र फडणवीस यांनीही केली होती. महाराष्ट्र मॉडेल हे यशस्वी नसल्याचेही त्यांनी यावेळी म्हटले होते. कोरोनाकाळात सर्वाधिक भ्रष्टाचार हा महाराष्ट्रात झाला असल्याचेही यावेळी ते म्हणाले. एकूणच काय ठाकरे सरकारच्या कारभारावर आता देशातूनच प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहे. आजवर महाराष्ट्रातील मृतांची संख्या ही सर्वाधिक असल्याचे अनेकदा स्पष्टपणे समोर आले आहे.
देशातील कोविड – १९ मुळे होणारा मृतांचा आकडा आता गेल्या चार दिवसांमध्ये हजाराच्या घरात आलेला आहे. गुरुवारी एकूण ९६२ मृत्यूची नोंद झाली. भारतामध्ये ५१ हजार २५६ नवीन रुग्णांची नोंद झालेली आहे. महाराष्ट्रातील रुग्णांची संख्या आता ६० लाखांच्या पुढे गेली आहे. देशातील आत्तापर्यंत सर्वाधिक रुग्णांची संख्या महाराष्ट्रातील आहे. त्यापाठोपाठ केरळ आणि कर्नाटकचा क्रमांक लागतो.
देशात कोविडमुळे होणारे मृत्यू झपाट्याने कमी होतायत, परंतु या सकारात्मक बातमीची काळी किनार म्हणजे अजूनही देशात होणाऱ्या एकूण मृत्यूपैकी ४१ टक्के मृत्यू महाराष्ट्रात होतायत. हे आहे वसूली सरकारचे 'महाराष्ट्र मॉडेल, जोडे मारण्याच्या लायकीचे… pic.twitter.com/vqjf56QVpB
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) June 25, 2021
गुरुवारी महाराष्ट्रात कोरोनामुळे सर्वाधिक १९७ मृत्यू झालेले आहेत. दरम्यान, दोन महिन्यांहून अधिक काळानंतर राजस्थानमध्ये कोरोनामुळे शून्य मृत्यूची नोंद झाली. तामिळनाडूमध्ये १५५, कर्नाटक १३८ आणि केरळमध्ये १३६ मृत्यूची नोंद झाली आहे.
केंद्राने राबवलेल्या लसीकरण मोहीमेस अनेक राज्यांमध्ये आता लसीकरण मोहीमेला वेग आलेला आहे. आत्तापर्यंत या सर्व लसीकरण मोहीमेला उत्तम प्रतिसाद मिळत असल्याने मोदींच्या या निर्णयाचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.