मच्छीमारांच्या आक्रोशासमोर पालकमंत्र्यांची बोलती बंद

मच्छीमारांच्या आक्रोशासमोर पालकमंत्र्यांची बोलती बंद

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांना मच्छीमारांच्या रोषाला सामोरे जावे लागले आहे. तौक्ते चक्रीवादळाचा फटका बसलेल्या भागाची पाहणी करायला पोहोचलेल्या पालकमंत्र्यांना स्थानिक मच्छीमार नागरिकांनी चांगलेच खडे बोल सुनावले. देवगड बंदर येथे हा प्रकार घडला असून संतप्त नागरिकांसमोर पालकमंत्र्यांची बोलती बंद झालेली पाहायला मिळाली.

गेले काही दिवस देशातील किनारपट्टीलगतच्या राज्यांना तौक्ते चक्रीवादळाचा फटका बसलेला दिसत आहे. यात महाराष्ट्रातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांतील किनारपट्टीलगतचा प्रदेशही होरपळून निघाला आहे. सध्या या वादळामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी नेत्यांचे दौरे सुरू झाले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनीही या वादळाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील फटका बसलेल्या भागाचा दौरा केला.

हे ही वाचा:

‘ते’ टूलकिट बनवणाऱ्याचे नाव समोर आल्याचा दावा

केजरीवालांचे बेजबाबदार वक्तव्य- एस. जयशंकर

बंगाली हिंदूंच्या प्रश्नावर १५ दिवसांनी न्यायालयाने घेतली दखल

मुख्यमंत्र्यांनी निदान मुंबईचा तरी दौरा करावा

बुधवार, १९ मे रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी देवगड तालुक्याचा पाहणी दौरा केला. पण त्यावेळी स्थानिक नागरिकांनी मंत्री महोदय यांची चांगलीच खरडपट्टी केली. आमचे लोक मरत होते तेव्हा तुमची यंत्रणा काय करत होती? तेव्हा मदतीला धावले असता तर आज मच्छीमारांचे जीव वाचले असते. आता कसली पाहणी करता? अशा शब्दात नागरिकांनी सरकार विरुद्ध चीड व्यक्त केली.

वादळ येणार हे माहीत असतानाही आपत्कालीन परिस्थितीसाठी काहीही नियोजन नव्हते. जेव्हा आम्हाला मदतीची खरी गरज होती तेव्हा कोणतीच यंत्रणा सज्ज नव्हती. मच्छिमार वाहून गेले तेव्हा नितेश राणे यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक यांना संपर्क साधल्यानंतर कोस्टल खात्याची मदत मिळाली. हीच मदत आधी मिळाली असती तर लोक मेले नसते किंवा बेपत्ताही झाले नसते अशा शब्दात मच्छिमारांनी पालक मंत्र्यांवर ताशेरे ओढले आहेत. संतप्त मच्छीमारांच्या प्रश्नांना आणि आरोपांना मंत्री उदय सामंत मात्र काहीच उत्तर देऊ शकले नाहीत.

Exit mobile version