कोविडची दुसरी लाट सांभाळता येत नसताना मुख्यमंत्र्यांची तिसऱ्या लाटेची तयारी

कोविडची दुसरी लाट सांभाळता येत नसताना मुख्यमंत्र्यांची तिसऱ्या लाटेची तयारी

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवार, ५ मे रोजी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेशी संवाद साधला. या लाईव्हचे मुख्य प्रयोजन हे मराठा आरक्षणाचा विषय केंद्र सरकारकडे ढकलणे असले, तरीही यावेळी सुरुवातीला त्यांनी राज्यातील कोरोना परिस्थितीवर भाष्य केले. याचवेळी महाराष्ट्र कोवीडच्या तिसऱ्या लाटेसाठी सज्ज होतोय असे मुख्यमंत्री म्हणाले.

आपल्या संवादाच्या सुरवातीलाच मुख्यमंत्र्यांनी सर्वोच्च न्यायालयाकडून मुंबई महापालिकेच्या कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांचे कौतुक केल्याचे सांगितले. त्याचवेळी त्यांनी राज्याच्या कोरोना परिस्थिबद्दलही भाष्य केले. महाराष्ट्रात सध्या कडक निर्बंधांचे सकारात्मक परिणाम दिसू लागले आहेत. महाराष्ट्राच्या दैनंदिन रुग्णवाढीच्या आकड्यात घट होताना दिसत आहे असे मुख्यमंत्र्यांकडून सांगण्यात आले. राज्यात सध्या ४,४६,६३९ इतके आयसोलेशन बेड्स आहेत. एक लाख बेड्स हे ऑक्सिजन सोबतचे आहेत. तर ३०,४१९ आयसीयू बेड्स आणि १२,१६९ व्हेन्टिलेटर्स आहेत असे मुख्यमंत्र्यानी सांगितले. तर केंद्र सरकारच्या वैज्ञानिक सल्लागारांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी तयार रहा असा इशारा दिला असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. त्यासाठी राज्य म्हणून आपण तयारी करत आहोत असेही मुख्यमंत्री म्हणाले.

याचवेळी त्यांनी लसीकरण, रेमडेसिवीर या गोष्टींवर पण भाष्य केले. केंद्र आपल्यापरीने साठा पाठवत असून त्यानुसार राज्यात लसीकरण सुरु आहे. ४५ वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणात सर्वाधिक लसीकरण हे महाराष्ट्रात झाले आहे. तर राज्याला आजवर मिळालेल्या रेमडेसिवीर साठ्याची माहिती दिली तर ४ मे रोजी महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांनी केंद्र सरकारच्या कॅबिनेट सचिवांना पत्र लिहून महाराष्ट्राची रुग्णसंख्या आणि परिस्थिती लक्षात घेता ७०,००० इंजेक्शन्स पुरवण्याची मागणी केली आहे.

हे ही वाचा:

मराठा आरक्षण रद्द झाल्याने महाराष्ट्रातील राजकारण तापले

ठाकरे सरकारची सर्वोच्च न्यायालयावर आगपाखड

ठाकरे सरकारकडून मराठा समाजाची फसवणूक

…तर देशभरातील भाजपा कार्यकर्ते प. बंगालमध्ये धडकतील

महाराष्ट्रात सध्या १२०० मॅट्रिक टॅन ऑक्सिजन तयार होतो, पण राज्याला १७०० मॅट्रिक टन ऑक्सिजनची गरज आहे. मग आपण केंद्र सरकारच्या परवानगीने आपण बाहेरून ५०० मॅट्रिक टन ऑक्सिजन मिळवतो. केंद्राला पत्र लिहून अधिक २०० मॅट्रिक टन ऑक्सिजन पुरवण्याची विनंती केली आहे. पण महाराष्ट्रातील ऑक्सिजन निर्मितीची क्षमता ३००० मॅट्रिक टन पर्यंत उत्पादन नेण्याचा राज्याचा प्रयत्न असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. त्याला ‘मिशन ऑक्सिजन’ असे नाव देत असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले. त्या दृष्टीने सुरवात झाल्याचेही त्यांनी सांगितले. त्यासाठी प्लॅन्ट उभारणी आणि इतर प्रक्रिया सुरु आहे.

Exit mobile version