पालिकेच्या निवडणुका तोंडावर आल्यानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार आता आपल्या कामांची प्रसिद्धी करण्यासाठी सरसावले आहे. या प्रसिद्धीसाठी त्यांनी पहिल्या टप्प्यात (जानेवारी ते मार्च) या तीन महिन्यांत साडेसोळा कोटी खर्च करण्याची तयारी केली आहे. गेल्या जवळपास दीड वर्षांत या सरकारने १५५ कोटी जाहिरातींवर खर्च केलेले आहेत.
राज्य सरकारच्या विविध योजना, धोरणे, प्रकल्प आणि लोककल्याणकारी योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या माध्यमातून प्रसिद्धीचे काम पाहिले जाते. त्यानुसार विविध वर्तमानपत्रांत जाहिराती देणे, खासगी वाहिन्या, खासगी एफएम वाहिन्या, दूरदर्शन व आकाशवाणीच्या माध्यमातून सरकारी संदेशाचा प्रसार करणे, विकासकामांवर आधारित माहितीपट तयार करणे, होर्डिंग्स लावणे, पथनाट्याच्या माध्यमातून सरकारच्या योजनांची माहिती देणे यासाठी खर्च केला जातो. येत्या काही महिन्यांमध्ये राज्यातील २३ महापालिका व २७ जिल्हा परिषद निवडणुका पार पडणार आहेत. त्यासाठी पुढील तीन महिन्यांत १६.५४ कोटी रुपये खर्च करून सरकारी योजनांची माहिती देण्यात येणार आहे.
हे ही वाचा:
प्रश्न विचारायला अक्कल लागत नाही; शेलारांची मुख्यमंत्र्यांवर प्रश्नांची सरबत्ती
योगी आदित्यनाथ गोरखपूरमधून उतरणार निवडणुकीच्या रिंगणात
२४ तासात देशात अडीच लाख कोरोना रुग्ण
केंद्र म्हणते महाराष्ट्रात पुरेसा लससाठा आहे
त्यात वर्तमानपत्रांतील जाहिरातींसाठी ४ कोटी, होर्डिंगसाठी ४.५ कोटी, सरकारच्या विकासकामांच्या माहितीसाठी २ कोटी ६० लाख, कलापथक व नाट्यपथकांसाठी १ कोटी ३० लाख, माहितीपट निर्मितीसाठी ८० लाख, समाजमाध्यमांवरील प्रसिद्धीसाठी ६० लाख, बॉटचॅट तयार करण्यासाठी ३० लाख असा खर्च केला जाणार आहे. मागच्या वर्षीही मोठा निधी प्रसिद्धीसाठी राखीव ठेवण्यात आला होता. हा निधी ४० त ४२ कोटी रुपये इतका होता.