महाराष्ट्रात उर्दू भाषा आणि संस्कृतीचा प्रचार, प्रसार करण्यासाठी ठाकरे सरकार मार्फत पाच ‘उर्दू हाऊस’ उभारली जात आहेत. राज्याचे अल्पसंख्यांक खात्याचे मंत्री नवाब मलिक यांनी याविषयी माहिती दिली आहे. मराठी आणि उर्दू भाषेतील वाढती देवाण घेवाण लक्षात घेता राज्यात पाच ठिकाणी उर्दू हाऊस बांधले जात आहे असे मलिक यांनी सांगितले.
मराठी भाषेचा मुद्दा पुढे करत मतांचा जोगवा मागणाऱ्या शिवसेनेच्या ठाकरे सरकारने राज्यात उर्दू हाऊस उभारणीसाठी कंबर कसली आहे. महाराष्ट्रात सोलापूर, नागपूर, मुंबई, नांदेड, आणि मालेगाव अशा पाच ठिकाणी उर्दू हाऊस उभे राहत असून त्यासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी हा सरकारने मंजूर केला आहे. यापैकी काही उर्दू हाऊसचे बांधकाम पूर्ण झाले असून काहींचे बांधकाम पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. तर काही उर्दू हाऊस अजून सुरू होणे बाकी आहे.
हे ही वाचा:
अजित दादांच्या सीबीआय चौकशीसाठी चंद्रकांत दादांचे पत्र
गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर दगडफेक
संकटात असलेल्या कोकणी माणसाची थट्टा थांबवा
शालेय पाठ्यपुस्तकात होणार ‘ऐतिहासिक’ सुधारणा
नांदेड येथील उर्दू हाऊससाठी ८ कोटी १६ लाख रुपयांचा निधी सरकारने मंजूर केला असून त्याचे बांधकाम हे पूर्ण झाले आहे. लवकरच त्याचे उद्घाटनही केले जाणार आहे. तर सोलापूर येथील उर्दू हाऊसचे बांधकाम हे अंतिम टप्प्यात आहे. त्यासाठी सरकारने ६ कोटी ८२ लाख इतका निधी आत्तापर्यंत दिला आहे. मालेगाव येथील उर्दू हाऊसचेही बांधकाम पूर्ण झाले असून लवकरच त्याच्या वापराला सुरुवात होणार आहे.
नागपूर येथे असलेल्या इस्लामिक कल्चरल सेंटर या सांस्कृतिक केंद्राचे उर्दू हाऊसमध्ये रूपांतर केले जाणार असून त्यासाठी पन्नास लाख रुपयांचे अनुदान राज्य सरकारने दिले आहे. तर महाराष्ट्राची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई मधील कलिना भागात उर्दू हाऊस उभारण्याचा प्रस्ताव आहे. कलिना येथे असलेल्या मुंबई विद्यापीठाच्या परिसरात हे उर्दू हाऊस उभारले जावे असा प्रस्ताव विद्यापीठाने राज्य सरकारला दिल्याचे सांगण्यात येत आहे.
या उर्दू हाऊसमध्ये विविध प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम तसेच विविध भाषांवरील पुस्तकांचे प्रकाशन इत्यादी गोष्टी होणार असल्याचे सांगितले जात आहे. तर एक अद्ययावत स्वरूपाचे ग्रंथालय या उर्दू हाऊसमध्ये असणार आहे. यात उर्दू, मराठी, हिंदी या भाषांमधील विविध पुस्तके तसेच अनेक वृत्तपत्रे आणि उर्दू भाषेतील मासिके वाचकांसाठी उपलब्ध असतील. तर उर्दू भाषा शिकण्यासाठीचे विविध कोर्स या उर्दू हाऊस मार्फत चालवले जाणार असल्याची माहिती मिळत आहे.