महाराष्ट्रातील ठाकरे सरकारला अखेर जाग आल्याचे दिसत आहे. शुक्रवार, २४ सप्टेंबर रोजी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्रातील प्रार्थना स्थळे उघडण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील महिन्यात ७ ऑक्टोबर या तारखेला म्हणजेच पवित्र अशा नवरात्रीच्या पहिल्या दिवशी, घटस्थापनेच्या शुभ मुहूर्तावर महाराष्ट्रातील सर्व प्रार्थनास्थळे भाविकांसाठी खुली केली जाणार आहेत.
लॉकडाऊनच्या फेऱ्यात अडकलेल्या महाराष्ट्रातील प्रार्थनास्थळे ही गेल्या अनेक महिन्यांपासून बंद होती. देशभरातील जवळपास सर्वच राज्यांत सर्व धर्मियांची प्रार्थनास्थळे ही भाविकांसाठी खुली करण्यात आली होती. पण महाराष्ट्रातील ठाकरे सरकार मात्र त्या संबंधीचा निर्णय घेत नव्हते. त्यासाठी प्रमुख विरोधी पक्ष असणाऱ्या भारतीय जनता पार्टीने वारंवार आंदोलने आणि पाठपुरावा केला होता. त्यालाच आता यश मिळताना दिसत आहे.
हे ही वाचा:
भारतीय हवाई दलात लवकरच येणार एअरबस
‘केंद्र सरकारने जे केले ते कोणताही देश करू शकत नाही’
४ ऑक्टोबरपासून शाळांमध्ये होणार किलबिलाट
भारताशी संबंध दृढ करण्यातच अमेरिका आणि फ्रान्सचे हित
अनेकांच्या उपजीविकेचा प्रश्न सुटणार
राज्यातील मंदिरांवर अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह अवलंबून असतो. पुजारी, फुल आणि हार विक्रेते, अगरबत्ती विक्रेते असा एक मोठा वर्ग उपजीविकेसाठी मंदिरांवर अवलंबून असतो. लॉकडाऊनच्या काळात या वर्गाला दिलासा देणारा कोणताही निर्णय ठाकरे सरकार मार्फत घेण्यात आला नव्हता. त्यामुळे या वर्गाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला होता. पण आता मंदिरे खुली होणार असल्यामुळे या वर्गाला एक मोठा दिलासा मिळणार आहे.