महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी रविवार, २५ जुलै रोजी कोकणातील पूरग्रस्त भागाची पाहणी केली. रत्नागिरी चिपळूण सह रायगड महाड पट्ट्यातही त्यांनी दौरा केला. या संपूर्ण पाहणीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ‘सरकारने निकषांचा विचार न करता तातडीची मदत करावी’ अशी मागणी त्यांनी सरकारकडे केली आहे.
फडणवीस यांनी यावेळी बोलताना तातडीची मदत पुरवताना निकशांचा विचार करायचा नसतो असे सांगितले. तर येणार्या काळात नंतर जी मदत केली जाईल ती निकषांचा विचार करून जास्तीत जास्त भरीव मदत देण्यात यावी असे ते म्हणाले. या पुरात नागरिकांची कागदपत्रे सुद्धा वाहून गेली आहेत. त्यामुळे जनतेकडे कागदपत्रे नाहीत याचा विचार करूनच सरकारने मदत करावी असे फडणवीसांनी सुचवले आहे.
२०१९ साली कोल्हापूर-सांगली येथील पुराच्या वेळी फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकारने थेट मदत दिली होती. याचीच आठवण करून देताना या वेळीही अशाच प्रकारची मदत सरकारमार्फत देण्यात यावी असे फडणवीस म्हणाले. तर नवीन घरे बांधून होत नाहीत तोवर लोकांना भाड्याचेही पैसे देण्यात यावेत अशी मागणी त्यांनी ठाकरे सरकारकडे केली आहे.
हे ही वाचा:
जनता तुमचो ह्यो माज उतरवल्या शिवाय रव्हची नाय!
मदतीची याचना करणाऱ्या महिलेवर भास्कर जाधवांची अरेरावी
आमदार खासदारांचा पगार इथे वळवा, पण आम्हाला मदत करा!
कोल्हापूरावर पुन्हा पुराचं सावट?
२०२० आणि २०२१ या दोन वर्षातच कोकण पट्ट्यात एकूण तीन वेळा नैसर्गिक आपत्ती आली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून विचार करावा लागेल असे फडणवीस यांनी सांगितले. त्यासाठी नव्या व्यवस्था उभ्या कराव्या लागतील आणि या दृष्टीने रोडमॅप तयार करण्याची नितांत आवश्यकता असल्याचे त्यांनी बोलून दाखवले.
तर यावेळी त्यांनी भाजपातर्फे सुरु असलेल्या मदत कार्याची माहितीही दिली. विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, माजी मंत्री गिरीश महाजन, कोकण विधान परिषद आमदार निरंजन डावखरे हे सुरुवातीपासूनच या पट्ट्यात फिरत आहेत. तर आतापर्यंत भाजपकडून तीन कम्युनिटी किचन सुरू करण्यात आली असून लोकांना मदत पुरवली जात आहे असे फडणवीस यांनी सांगितले.