केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने इंधनाचे दर कमी करत सामान्य माणसांना दिलासा दिला. यानंतर महाराष्ट्रातील उद्धव ठाकरे सरकारनेही इंधनावरील करात कपात करत असल्याचे सांगितले होते. पण प्रत्यक्षात मात्र हा केंद्राच्या निर्णयचाच परिणाम होता. यावरूनच महाराष्ट्राचे राजकारण आता तापत असून विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे. ठाकरे सरकारने मे महिन्यात महाराष्ट्राच्या जनतेला एप्रिल फूल केले असा सणसणीत टोला फडणवीस यांनी लगावला आहे.
ट्विटरच्या माध्यमातून फडणवीसांनी ठाकरे सरकारचा समाचार घेतला आहे. महाविकास आघाडी सरकारने राणा भीमदेवी थाटात राज्यात इंधनावरील व्हॅट कमी झाल्याची माहिती शासकीय ट्विटर हँडलवरून प्रसारित केली. प्रत्यक्षात ही शुद्ध फसवणूक आहे. महाविकास आघाडी सरकारने दरकपातीचा कोणताच निर्णय घेतला नाही, तर केंद्राच्या निर्णयाचा हा स्वाभाविक परिणाम आहे असे फडणवीसांनी लिहिले आहे. तर हे लज्जास्पद असल्याचेही फडणवीस यांनी म्हटले आहे.
हे ही वाचा:
इंग्लंडमधील काँग्रेस कार्यकर्त्यांपुढे सोनिया गांधीनी पसरला पदर
जपानी मुलाचं हिंदी ऐकून पंतप्रधान मोदी म्हणाले…
मशिदींतून काढलेले भोंगे शाळा, रुग्णालयांना दान
‘१.५, २ रुपये इंधन दर कमी करणे ही सामान्य माणसाची क्रूर थट्टा’
महाराष्ट्रात पेट्रोलवर २.०८ रुपये आणि डिझेलवर १.४४ रुपये जे कमी झाले, तो रोड अँड इन्फ्रास्ट्रक्चर सेस केंद्र सरकारने कमी केल्याने राज्याचा कर कमी झाला आहे. स्वत: काहीच करायचे नाही आणि केंद्राने घेतलेल्या निर्णयाच्या परिणामांचे सुद्धा श्रेय घ्यायचे, हे फारच गंभीर आहे.
महाविकास आघाडी सरकारने लोकांना मुर्ख न बनविता तात्काळ पेट्रोल-डिझेल दरकपातीचा निर्णय घ्यावा अशी मागणी पुन्हा एकदा फडणवीस यांनी केली आहे. तर सरकारची कालची घोषणा पाहून ‘उंटाच्या तोंडात जिरे’ असे मी म्हटले होते. पण, प्रत्यक्षात तर हा संपूर्ण प्रकार मे महिन्यात ‘एप्रिल फूल’ करणारा ठरला असा घणाघात फडणवीसांनी केला आहे.