कोरोना संसर्गाची दुसरी लाट आली आहे. त्यात महावितरणकडून ग्राहकांना अव्वाच्या सव्वा वाढीव वीजबिले देऊन लूट होत असल्याचे प्रकार समोर येत आहेत. असाच काही प्रकार नाशिकच्या निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत येथे घडला आहे. झोपडीतील राहणाऱ्या हमालकाम करणाऱ्या संतोष जाधव यांना ६९ हजार रुपयांचं बील आलं आहे. झोपडीत राहणाऱ्या वीजग्राहकाला ६९ हजार रुपयांचे बिल देत महावितरणनं शॉक दिल्याची चर्चा आहे. यानिमित्तानं महावितरणचा भोंगळ कारभार पुन्हा यानिमित्ताने चव्हाट्यावर आला.
पिंपळगाव बसवंत शहरातील उंबरखेड रस्त्यावरील भाऊनगर येथील रहिवासी संतोष जाधव हा महावितरणचा ग्राहक आहे. तो झोपडपट्टीत पत्र्याच्या घरात राहतो. संतोष जाधवला महावितरणकडून ६९ हजार रुपयांचे वीजबिल देत विजेचा जोरदार झटका देण्यात आला आहे.गेल्या वर्षी लॉकडाऊनच्या अगोदर संतोष जाधवने ४६० रुपयांचे शेवटचे वीजबिल भरले होते. याचा विचार करता फार तर फार सात किंवा आठ हजार रुपयांपर्यंत वीज बिल येणे अपेक्षित होते.
कोरोनाची पहिली लाट आल्याने सर्व व्यवसाय ठप्प झाले होते. त्यामुळे कुटुंब कसे चालवावे हा प्रश्न उभा असल्याने वीज बिल भरले नाही आणि आता पुन्हा कोरोनाची दुसरी लाट आली आहे. त्यात लॉकडाऊनसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याने हाताला काम नाही. त्यात महावितरणने ६९ हजार रुपयांचे वीजबिल आकारले आहे. हे कसे भरावे असा प्रश्न आता उभा राहिल्याचं संतोष जाधव म्हणाले.
हे ही वाचा:
सर्वोच्च न्यायालयाकडूनही अनिल देशमुखांना चपराक
मुस्लिम तुष्टीकरणामुळे ममतांना निवडणूक आयोगाकडून नोटीस
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला कोविड लसीचा दुसरा डोस
ग्राहकाला ६९ हजार रुपये बील पाठवून ही सुद्धा वीज वितरण कंपनीच्याअधिकाऱ्यांची भूमिका जनतेला सहकार्याची नसल्याचं दिसतं. ज्यांच्या काही तक्रारी असतील त्यांनी कक्ष कार्यालयात येऊन संपर्क साधावा. जेणेकरून त्यांच्या तक्रारी वरिष्ठ कार्यालयाला देऊन योग्य तो न्याय द्यायचा प्रयत्न करू, पिंपळगावचे सहायक अभियंता नितीन पगारे यांनी सांगितलं. वीज ग्राहकांना अव्वाच्या सव्वा वीजबिले आकारून शॉक देण्याच्या आधी वीज वितरण कंपनीला जाग येणार का हे पाहणे महत्त्वाचे आहे.