मुख्यमंत्री, टास्क फोर्सचे ‘मिले सूर मेरा तुम्हारा’

मुख्यमंत्री, टास्क फोर्सचे ‘मिले सूर मेरा तुम्हारा’

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत लॉकडाऊनच्या दृष्टीने संकेत दिल्या नंतर, रविवारी झालेल्या कोविड टास्क फोर्सच्या बैठकीतही लॉकडाऊनच्या दृष्टीने सूर उमटला. राज्यातील कोरोनाची साखळी तोडायची असले तर लॉकडाऊन गरजेचा आहे असे मत या बैठकीत मांडण्यात आले.

रविवारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्याच्या कोविड टास्क फोर्सची एक बैठक घेतली. व्हिडीओ कॉन्फरंसिंगच्या माध्यमातून ही बैठक घेतली गेली. या बैठकीत महाराष्ट्रातील कोरोनाच्या सद्य स्थितीचा आढावा घेण्यात आला. महाराष्ट्रातील कोरोना परिस्थिती ही हाताबाहेर गेली आहे. तेव्हा महाराष्ट्रात लॉकडाऊन लावावा का? यासंबंधी या बैठकीत चर्चा झाली. या बैठकीत टास्क फोर्समधील तज्ज्ञांकडून लॉकडाऊन लावण्याच्या दृष्टिने मत मांडले गेले. कोरोना साखळी तोडायची असल्यास १४ दिवसांचा कडक लॉकडाऊन लावावा लागेल असे मत तात्याराव लहानेंकडून मांडण्यात आल्याचे समजते. तर नव्या स्ट्रेनच्या दृष्टीने उपाय योजना कराव्या लागतील असेही मत उमटले. शनिवारी झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत मुख्यमंत्र्यांनी याच पद्धतीची मते मांडली होती. त्यामुळे टास्क फोर्समधील डॉक्टर्सनी लॉकडाऊन शिवाय पर्याय नाही असे म्हणत मुख्यमंत्र्यांच्या सुरात सूर मिसळलेला दिसत आहे.

हे ही वाचा:

लॉकडाउनचा पेच, संभ्रमाचा चक्रव्यूह

काशी विश्वेश्वराच्या वतीने याचिका दाखल करणाऱ्यांना धमकीचे फोन

पश्चिम बंगालमधून स्फोटक साहित्य जप्त

‘अशोक’ समजून ज्याच्याशी लग्न केले तो निघाला ‘अफजल खान’

राज्यात कोरोना फोफावलेला असताना आरोग्य सुविधांचीही पुरेशी व्यवस्था दिसत नाही. बेड्स अपुरे पडत आहेत, ऑक्सिजन आणि व्हेंटीलेटर्सचा तुटवडा जाणवत आहे. या अनुषंगानेही बैठकीत चर्चा झाली. उपचार पद्धती आणि आरोग्य सुविधांच्या बाबतीत चर्चा झाली. ऑक्सिजन, बेड्स आणि रेमडेसीवीर इंजेक्शनच्या उपलब्धतेबाबत बैठकीत मत मांडले गेले. तर यासोबत निर्बंध लावणे आणि दंडात्मक कारवाईबाबतही चर्चा झाली.

रविवारी संध्याकाळी ५.३० ला सुरु झालेली ही बैठक तब्बल पाऊणे दोन तास चालली. टास्क फोर्सच्या बैठकीनंतर लॉकडाऊन संदर्भात निर्णय घेण्यात येईल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून शनिवारच्या सर्वपक्षीय बैठकीत सांगण्यात आले होते. त्यामुळे आता या बैठकीनंतर मुख्यमंत्री नेमका काय निर्णय घेणार आणि लॉकडाऊन लावला तर तो नेमका किती दिवस लावणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

Exit mobile version