मुख्यमंत्र्यांचे लॉकडाऊनचे संकेत, पॅकेजबद्दल मात्र मौन

मुख्यमंत्र्यांचे लॉकडाऊनचे संकेत, पॅकेजबद्दल मात्र मौन

राज्यातील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन गरजेचा आहे असे म्हणत महाराष्ट्रात ठाकरे सरकारने लॉकडाऊन लावण्याचे संकेत दिले आहेत. पण याचवेळी राज्याच्या गोरगरीब जनतेला दिलासा देण्यासाठीच्या पॅकेजबद्दल मात्र त्यांनी सोयीस्कर मौन बाळगले. शनिवारी संध्याकाळी झालेल्या सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते. राज्यातील कोरोना परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लॉकडाऊनला पर्याय नाही असे मत यावेळी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले आहे. तर दुसरा कोणताही उपाय नाही असेही मत मुख्यमंत्र्यांनी मांडले आहे. लॉकडाऊन ही आता राज्याची गरज झाली आहे असेही मुख्यमंत्री म्हणाले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी सर्वपक्षीय बैठक बोलवली होती. संध्याकाळी ५ वाजता ही बैठक सुरु झाली. या बैठकीला राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, आरोग्यमंत्री राजेश टोपे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील आदी नेते उपस्थित होते. तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे या बैठकीला अनुपास्थित होते. या बैठकीत लॉकडाऊनच्या दृष्टीने चर्चा झाली.

हे ही वाचा:

ठाकरे सरकारचा पर्दाफाश… लसीच्या तुटवड्याच्या दावा खोटा

पश्चिम बंगाल निवडणूक: हिंसाचारात पाच तरुणांचा मृत्यू

जेव्हा उदयनराजे भिक मागायला बसतात

पश्चिम बंगालमध्ये पराभव अटळ, तृणमूलच्या ‘या’ नेत्याची कबुली

भाजपाचा विरोध
राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भारतीय जनता पार्टीकडून या लॉकडाऊनच्या निर्णयाला विरोध करण्यात आला आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाजपाची बाजू या बैठकीत मांडली. आमचे सरकारला सहकार्य असेल पण लॉकडाऊन हा काही पर्याय नाही. सरकारने नागरिकांच्या भावनेचाही विचार करा. तसेच होरपळलेल्या जनतेला दिलासा देत पॅकेज जाहीर करावे असेही भाजपाने म्हटले आहे. कडक निर्बंध असावेत पण संपूर्ण लॉकडाऊन असू नये असे मत भाजपातर्फे या बैठकीत मांडण्यात आले आहे. तर सतत केंद्राकडे बोट दाखवू नका असे म्हणत त्यांनी सरकारला खडसावले. प्रवीण दरेकर यांनी शासन जर ऑक्सिजन आणि व्हेन्टिलेटर्स पुरवत असेल तर त्याची आकडेवारी द्यावी अशी मागणी केली. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी बोलताना आमदारांचा दोन कोटी निधी कमी करावा अशी मागणी करण्यात आली आहे. तर कामगारांना प्रत्येकी ५००० रुपये देण्यात यावे असे ते म्हणाले. कडक निर्बंध आणि लोकांच्या जगण्यात समन्वय असावा असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.

कटू निर्णय घ्यावे लागतील:- काँग्रेस
राज्यातील कोरोनाची नियंत्रणात आणण्यासाठी काही कटू निर्णय घ्यावे लागतील असे मत या बैठकीत काँग्रेसच्या नेत्यांकडून मांडण्यात आले. मृत्यू थांबवणे अत्यावश्यक आहे असे म्हणत त्यासाठी कठोर निर्णय घ्यावे लागतील आणि ते घेण्याची आता वेळ आली आहे असे काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण या बैठकीत म्हणाले. पण याचवेळी लॉकडाऊन करायचा असेल तर गरिबांचा विचार करावा असेही ते म्हणाले. तर बाळासाहेब थोरात यांनी गुजरातकडून रेमडेसिवीर इंजेक्शनची आयात करण्यात यावी असे मत मांडले आहे.

मुख्यमंत्र्यांनी आवश्यक तो निर्णय घ्यावा:- राष्ट्रवादी काँग्रेस
राज्याच्या हिताच्या दृष्टीने मुख्यमंत्र्यानी आवश्यक तो निवूर्णय घ्यावा त्याला आमचे सहकार्य असेल असे मत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे. पण जो काय निर्णय असेल तो सर्वांनी मिळून घ्यावा असे अजित पवार यांनी म्हटले आहे. रेमडेसिवीरचा कृत्रिम तुटवडा आहे असे निरीक्षण त्यांनी नोंदवले तर हा काळाबाजार रोखण्यात आपल्याला यशस्वी व्हावे लागेल असेही ते म्हणाले. गरिबांना योग्य ती मदत मिळावी असे वैयक्तिक मतही त्यांनी मांडले.

मनसेचा विरोध
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे त्यांच्या हातावर शस्त्रक्रिया होणार असल्याने या बैठकीला उपस्थित नव्हते. पण तरीही बैठकीतील एकूण चर्चेचा सूर बघता आपला कडक निर्बंध अथवा लॉकडाऊनला विरोध असेल अशी अधिकृत भूमिका मनसेतर्फे मांडण्यात आली आहे.

थोडी कळ सोसावी लागेल:- मुख्यमंत्री
या बैठकीचा समारोप पुन्हा मुख्यमंत्र्यांनी आपले मत मांडून केला. सर्व नेत्यांनी दिलेल्या सूचना चांगल्या आहेत आणि मी त्याची नोंद घेतो असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. कडक निर्बंध आणि सूट असे दोन्ही एकत्र शक्य नाही. आपल्याला सध्या कडक निर्बंधात थोडी कळ सोसावी लागेल असे ते म्हणाले. पहिले आठ दिवस कडक लॉकडाऊन लावून टप्प्याटप्प्याने एक एक गोष्टी सुरु करायचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. कोरोनाचा गुणाकार थांबायला हवाय आणि त्यासाठी पुढच्या दोन दिवसांत अंदाज घेऊन आवश्यक तो निर्णय घेतला जाईल असे ते म्हणाले

Exit mobile version