लॉकडाऊनच्या तयारीला लागा…मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला आदेश

लॉकडाऊनच्या तयारीला लागा…मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला आदेश

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी राज्याच्या प्रशासनाला लॉकडाऊनच्या दृष्टीने तयारी करण्याचे आदेश दिले आहेत. राज्यातील कोरोना परिस्थिती दिवसेंदिवस अधिकच गंभीर होत चालली आहे. नागरिक हे नियमांचे पालन करताना दिसत नाहीयेत. अशा परिस्थितीत राज्यातील परिस्थिती आणखीनच चिंताजनक होऊ शकते अशावेळी प्रशासनाने लॉकडाऊनच्या दृष्टीने नियोजनासाठी सुरुवात करावी असे आदेश महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रशासनाला दिले आहेत.

रविवारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोवीड टास्क फोर्स आणि राज्याचे आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांच्यासोबत बैठक घेतली. या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेत त्याविषयी चिंता व्यक्त केली. राज्यातील जनता नियम पाळत नसून यामुळेच राज्यातील कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे असे मत उद्धव ठाकरे यांनी या बैठकीत उपस्थित केले. हे असेच चालू राहिले तर राज्यात लॉकडाऊनसारखे कठोर निर्बंध आणावे लागतील असे मत उद्धव ठाकरे यांनी मांडले. त्यामुळे त्यासाठीचे नियोजन करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

हे ही वाचा:

मिठी नदीतून सापडले सचिन वाझेच्या पापाचे पुरावे

कम्युनिस्ट नेत्याच्या हत्येसाठी तृणमूल नेत्याला अटक

उद्धव ठाकरेंना कणा नाही, हे सरकार बरखास्त करा

वाझेचा साथीदार धनंजय गावडेची अटक आता अटळ

महाराष्ट्राची बिकट झालेली कोविड परिस्थिती लक्षात घेता रविवारपासून राज्यात रात्रीची जमावबंदी लावण्यात आली आहे. शनिवारी मुख्यमंत्री कार्यालयातर्फे या जमावबंदीची नियमावली जाहीर करण्यात आली आहे. या नियमावलीत कुठल्या गोष्टींना कुठल्या वेळेत परवानगी आहे आणि कशावर बंदी आहे हे जाहीर करण्यात आले आहे.

काय आहेत निर्बंध?
महाराष्ट्र शासनाच्या जमावबंदीच्या नियमावलीनुसार खालील प्रकारचे निर्बंध घालण्यात आले आहेत. रात्री ८ ते सकाळी ७ या वेळेत ५ पेक्षा जास्ती लोकांना एकत्रित फिरण्यास बंदी असणार आहे. या गोष्टीचे उल्लंघन केल्यावर माणशी एक हजार रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे. यासोबतच रात्री ८ ते सकाळी ७ यावेळेत उद्याने, समुद्र किनारे, रेस्टोरंट्स, सिनेमागृह, नाट्यगृह, मॉल्स अशी सगळी सार्वजनिक ठिकाणे बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. रेस्टोरंट्सना रात्री ८ नंतर डिलिव्हरीची सेवा देण्यास परवानगी आहे. विना मास्क फिरणाऱ्या लोकांना ५०० रुपये दंड ठोठावण्यात येणार आहे तर उघड्यावर थुंकणाऱ्यांकडून १००० रुपये दंड आकारण्यात येणार आहे. सर्व प्रकारच्या राजकीय, सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. लग्न समारंभांना ५० माणसांना हजार राहण्यास परवानगी असेल. तर अंत्यविधीसाठी २० जण उपस्थित राहू शकतात.

Exit mobile version