मुख्यमंत्री समोर आलेच नाहीत

मुख्यमंत्री समोर आलेच नाहीत

महाराष्ट्रात लॉकडाऊन करण्याचा निर्णय मुख्यमंत्री जाहीर करणार असे सांगत राज्यातील अनेक मंत्र्यांनी हवा निर्माण केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी मात्र वेगळाच निर्णय घेतला. मुख्यमंत्र्यानी आपले फेसबुक लाईव्ह रद्द केले. त्यांच्या जागी राज्याचे मुख्य सचिव हे राज्यातील लॉकडाऊन संदर्भातील निर्णय जाहीर करणार असल्याची माहिती मिळत होती. पण नंतर मुख्यमंत्री कार्यालयाच्या ट्विटर हॅण्डलवरून नवीन नियमावली जाहीर करण्यात आली आहे.

मंगळवार, २० एप्रिल रोजी झालेल्या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यात कडक लॉकडाऊन लावण्याचा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्रात सातत्याने होत असलेला कोरोना रुग्णवाढीचा विस्फोट पाहता राज्यात कडक निर्बंध लावण्यात आले होते. पण सरकारने लावलेल्या कडक निर्बंधांचा कोणताही परिणाम झाला नाही. राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या ही वाढतच आहे. वाढणाऱ्या रुग्णसंख्येच्या मानाने राज्यातील आरोग्य व्यवस्था अपुऱ्या पडत आहेत. बेड्स, ऑक्सिजन, रेमडेसिवीर या साऱ्याच गोष्टींची कमतरता जाणवत आहे. याच सगळ्या पार्श्वभूमीवर राज्याच्या मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक मंगळवारी दुपारी पार पडली. या बैठकीत राज्यातील एकूणच कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. कोरोनाची साखळी तोडायची असेल तर लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही असा सूर सगळ्याच मंत्र्यांचा दिसून आला. त्यामुळे आता राज्यात पुन्हा एकदा कठोर लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

हे ही वाचा:

फडणवीसांनी प्रियांकांना झापले!

नाशिकमध्ये ऑक्सिजन गळतीची भयंकर घटना, २२ रुग्णांचा तडफडून मृत्यू

राज्याचा आरोग्यमंत्री इतका असंवेदनशील कसा असू शकतो?

नाशिक मनपा रुग्णालयातील ऑक्सिजन गळतीची राष्ट्रीय स्तरावर दखल

महाराष्ट्रात होणाऱ्या या लॉकडाऊन संदर्भातील निर्णय राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राच्या जनतेशी संवाद साधून जाहीर करतील असे सांगण्यात आले होते. यावेळी मुख्यमंत्री लॉकडाऊनची नवी नियमावली, निर्बंध या सगळ्या विषयीच माहिती देतील असे सांगण्यात आले होते. पण मुख्यमंत्र्यांनी ऐनवेळी आपला हा संवाद रद्द केला. त्यानंतर मुख्यमंत्री कार्यालयाच्या ट्विटर हॅण्डलवरून रात्री लॉकडाऊन संदर्भातील नवी नियमावली जाहीर करण्यात आली आहे. बुधवारी रात्री साडे दहाच्या आसपास ट्विट करत महाराष्ट्रातील लॉकडाऊनचे नवे प्रसिद्धीपत्रक जाहीर करण्यात आले.

मुख्यमंत्र्यांच्या अशाप्रकारे जनतेशी संवाद न साधण्याच्या निर्णयावर भाजपा नेते आमदार अतुल भातखळकर यांनी ताशेरे ओढले आहेत. मुख्यमंत्र्यांना आज जनतेसमोर जाण्याचे धाडसाचं झाले नाही असा टोला भातखळकरांनी लगावला आहे.

Exit mobile version