भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहिले आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच परिवहन मंत्री अनिल परब यांची सीबीआय चौकाशी करण्यात यावी अशी मागणी या पत्राद्वारे करण्यात आली आहे. सचिन वाझे याने एनआयए न्यायालयात दिलेल्या आपल्या जबाबात अजित पवार आणि अनिल परब यांची नावे घेत त्यांच्यावरही वसुलीचे आरोप केले होते. त्यामुळेच त्यांची सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी महाराष्ट्र भाजपातर्फे केली गेली आहे.
गेल्या आठवड्यात मुंबई येथे भारतीय जनता पार्टीची महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी बैठक पार पडली. या बैठकीत राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील प्रमुख मंत्री असणारे अजित पवार आणि अनिल परब या दोघांची सीबीआय चौकशी करण्यात यावी असा राजकीय ठराव पारित केला गेला. सचिन वाझे याने एनआयए न्यायालयात दिलेल्या कबुलीमध्ये या दोघांची नावे घेतून त्यांच्यावर केलेल्या आरोपामुळे त्यांची चौकशी करण्यात यावी असे भाजपाचे म्हणणे आहे.
हे ही वाचा:
आयपीएल २०२२ मध्ये १० संघ खेळणार
भारतात ‘सबका साथ’वर शिक्कामोर्तब
महिना १०० कोटी खंडणी गोळा करण्याआधी केंद्राला विचारले होते काय?
निर्बंध झुगारत नवी मुंबईत दुकानं उशिरा पर्यंत सुरूच
अँटिलीया स्फोटके प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात अटकेत असलेल्या वाझेने एनआयए न्यायालयात नोंदवलेल्या जबाबात अनेक गौप्यस्फोट केले. महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या वसुलीच्या आरोपांची वाझे यांनी पुष्टी केली. तर त्यासोबतच वाझे याने राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि दर्शन घोडावत यांची नावे घेत त्यांनी १०० कोटी रुपयांची वसुली करायला सांगितल्याचे म्हटले आहे. तर परिवहन मंत्री अनिल परब यांनीही मुंबई महापालिकेच्या ५० कंत्राटदारांकडून प्रत्येकी २ कोटी रुपये वसूल करायला सांगितल्याचा आरोप वाझे याने केला आहे.
हे आरोप गंभीर स्वरूपाचे आहेत. त्यामुळे ज्याप्रमाणे न्यायालयाच्या निर्देशावरून अनिल देशमुख यांची सीबीआय मार्फत चौकशी केली जात आहे तशीच चौकशी अजित पवार आणि अनिल परब यांचीही केली जावी अशी मागणी महाराष्ट्र भाजपातर्फे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.