“सोमवारच्या आत संजय राठोडांची हकालपट्टी झाली नाही तर आम्ही सभागृहाचे कामकाज चालू देणार नाही” – चंद्रकांत दादा पाटील

“सोमवारच्या आत संजय राठोडांची हकालपट्टी झाली नाही तर आम्ही सभागृहाचे कामकाज चालू देणार नाही” – चंद्रकांत दादा पाटील

महाराष्ट्रातील प्रमुख विरोधी पक्ष असणारी भारतीय जनता पार्टी संजय राठोड प्रकरणात चांगलीच आक्रमक झालेली दिसत आहे. भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी राज्य सरकारला अल्टिमेटम दिले आहे. “सोमवारपर्यंत संजय राठोड यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी व्हावी. मुख्यमंत्र्यांनी सोमवारी सभागृहात येऊन सांगावे की संजय राठोड यांच्यावर काय कारवाई झाली. अन्यथा आम्ही सभागृहाचे कामकाज होऊ देणारा नाही.” असा इशारा चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे. शनिवारी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून चंद्रकांत पाटील यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

पूजा चव्हाण या तरुणीच्या मृत्यू प्रकरणात महाराष्ट्राचे वनमंत्री संजय राठोड याचे नाव पुढे आल्यापासून विरोधी पक्ष चांगलाच आक्रमक झालेला दिसत आहे. वनमंत्री संजय राठोडने राजीनामा द्यावा या मागणीसाठी भाजपातर्फे सरकारवर चांगलाच दबाव आणला जात आहे. आज भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चातर्फे राज्यात १०० ठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्यात आले. भाजपाच्या युवा मोर्चा आणि ओबीसी मोर्चातर्फे १ मार्च आणि ३ मार्च रोजी राज्यव्यापी आंदोलन होणार आहे. यातच आता भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी सरकारला इशारा दिला आहे. “राठोड यांचा राजीनामा घ्या. त्यांची चौकशी करा. ते निर्दोष आढळले तर त्यांना पुन्हा मंत्रिमंडळात घ्या. वाटलं तर आणखीन चांगले खाते घ्या.” असे पाटील म्हणाले आहेत.

हे ही वाचा:

गब्रूंना पाठीशी घालणारे पुरोगामी, विचारी

भाजपा चित्राताईंच्या सोबत उभा आहे
भारतीय जनता पार्टीच्या नेत्या आणि प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ ह्या सुरुवातीपासूनच संजय राठोड प्रकरणात आक्रमक झालेल्या दिसत आहेत. पण आता त्यांच्या यजमानांविरोधात अँटी करप्शन विभागातर्फे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई सूडबुद्धीने झाली असल्याचे आरोप होत आहेत. याच विषयात बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, “धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचे आरोप होतात पण सरकारची कारवाई होत नाही. एका मंत्र्याच्या जावयाला ड्रग्सच्या केसमध्ये अटक होते पण सरकार कारवाई करत नाही. एक मंत्री बंगल्यावर नेऊन एका माणसाला मारहाण करतो पण त्याच्यावर कारवाई होत नाही. सत्तेतील एका पक्षाच्या युवक अध्यक्षावर बलात्काराचा आरोप होतो त्याच्या विरोधात काही कारवाई केली जात नाही. पण पूजा चव्हाण प्रकरणात सातत्याने आवाज उठवणाऱ्या चित्राताई वाघ यांच्या नवऱ्याविरोधात मात्र एसीबी तर्फे गुन्हा दाखल केला जातो. या अशा कारवाईने चित्राताई घाबरणार नाहीत. त्या वाघीण आहेत आणि संपूर्ण पक्ष त्यांच्या सोबत उभा आहे.”

हे ही वाचा:

संजय राठोड यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत चित्रा वाघ गप्प बसणार नाही

मुख्यमंत्र्यांना फक्त खुर्चीची काळजी
माध्यमांशी बोलताना शिवसेना नेते संजय राऊत मुख्यमंत्री सत्यवादी आहेत असं म्हणाले होते. यावरूनही चंद्रकांत पाटील यांनी चांगलाच टोला लगावला आहे. मुख्यमंत्र्यांचा सत्यवादीपणा व्यवहारातून दिसत नाहीत. “मी मगाशी दहा प्रकरणांची यादी सांगितली. त्या प्रकरणात मुख्यमंत्र्यांचा सत्यवादीपणा दिसत नाही. त्यात त्यांची फक्त खुर्चीची काळजीच दिसते.” असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.

Exit mobile version