लखीमपूर प्रकरणी उद्या ‘सरकारी महाराष्ट्र बंद’

लखीमपूर प्रकरणी उद्या ‘सरकारी महाराष्ट्र बंद’

लखीमपूर येथे झालेल्या शेतकऱ्यांच्या मृत्युचा निषेध करण्यासाठी चक्क महाराष्ट्रातील सत्ताधारी तीन पक्षांनी सोमवार, ११ ऑक्टोबरला बंदची हाक दिली आहे. सत्तेत असलेल्या पक्षांनीच बंदची घोषणा करण्याची ही पहिलीच वेळ आहे.

शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस या तीन पक्षांचे सरकार सध्या महाराष्ट्रात आहे. लखीमपूर, उत्तर प्रदेश येथे शेतकऱ्यांचा गाडीखाली चिरडून मृत्यू झाला. त्यानंतर महाराष्ट्रातील या तिन्ही सत्ताधारी पक्षांनी बंदची घोषणा केली आहे. अत्यावश्यक सेवा सुरू राहतील पण बाकी सगळ्या गोष्टी बंद असतील, असे जाहीर करण्यात आले आहे.

महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यात झालेले बलात्कार आणि हत्येच्या घटना, कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह याविषयी विरोधी पक्षाने सातत्याने आवाज उठविला पण त्यावर काहीही न बोलणाऱ्या सरकारमधील तीन पक्षांनी आता थेट उत्तर प्रदेशमधील घटनेवरून महाराष्ट्रात बंदचे आवाहन केल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. एखाद्या प्रश्नावर विरोधी पक्ष आंदोलन करून बंद, चक्काजाम अशा घोषणा करत असतात पण प्रथम सरकारमधील पक्षच महाराष्ट्र बंदचे आवाहन करताना दिसत असल्यामुळे जनसामान्यांत आश्चर्याची भावना आहे.

 

हे ही वाचा:

नवाब मलिकांची मती भंगार मध्ये गेलेली

सीबीआयच्या सुबोध जैसवाल यांना सीआयडीचे समन्स

पवित्र पोर्टलमध्ये होते आहे ‘अपवित्र’ भरती

मुंबई पोलिसांनीही अमली पदार्थविरोधी मोहीम केली तीव्र

 

कोरोनाचा प्रादुर्भाव थोडा कमी झाल्यानंतर आता सगळ्या गोष्टी सुरू झालेल्या आहेत. शाळा, महाविद्यालये खुली होऊ लागली आहेत. कार्यालयेही खुली झाली आहेत. पण तेवढ्यात सरकारमधील पक्षांनीच एक दिवस हे सगळे बंद करण्याचे आवाहन केले आहे. उत्तर प्रदेशमधील घटनेसाठी महाराष्ट्र बंद करण्याची काय गरज, असा सवाल सर्वसामान्यांकडून उपस्थित केला जात आहे.

महाराष्ट्रातील घडणाऱ्या घटनांसाठी उत्तर प्रदेशमधील पक्षांनी कधीही उत्तर प्रदेश बंदची घोषणा केलेली नसताना महाराष्ट्रातील सत्ताधारी पक्षच बंदची घोषणा कशी काय करतात, असाही सवाल लोक आता विचारू लागले आहेत.

Exit mobile version