उद्यापासून म्हणजेच बुधवार, २२ डिसेंबर रोजी महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरु होत आहे. या अधिवेशनामुळे ऐन थंडीत राज्याचे राजकीय वातावरण तापणार आहे. विरोधकांनी आधीच याचे संकेत दिले आहेत. सरकारच्या चहापानावर विरोधी पक्षाने बहिष्कार टाकून आपला अजेंडा आधीच स्पष्ट केला आहे. तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत सरकारच्या कारभाराचे वाभाडे काढले आहेत.
या अधिवेशनात ओबीसी आरक्षण, परीक्षांचे घोटाळे, शिवभोजन थाळीतील भ्रष्टाचार, विद्यापीठ कायद्यातील प्रस्तावित बदल, अमरावती मध्ये उसळलेली दंगल, सरकारचा कारभार, अशा अनेक मुद्द्यांवरून सरकारला घेरण्याचा तयारीत विरोधक आहेत. विरोधी पक्षाच्या १२ आमदारांच्या निलंबनाचा मुद्दा गाजणार आहे. या अधिवेशनात विरोधी पक्षाची भूमिका चर्चेची असणार आहे. अधिवेशनात गोंधळ होऊ नये, जास्तीत जास्त चर्चा व्हावी अशी भूमिका फडणवीस यांनी मांडली. तर सरकारने चर्चा होऊ दिली नाही तर आम्ही इतर माध्यमे वापरून आवाज उठवू आणि आमचे म्हणणे मांडू असा इशारा फडणवीस यांनी दिला आहे.
हे ही वाचा:
शिवभोजन थाळीच्या नावावर दोन घोट ज्युस
ब्रिटनमधील शीख खासदाराने हिंदू विरोधी ट्विट हटवले
बड्या धेंडांकडून १३ हजार कोटी वसूल
पेपरफुटी प्रकरणी आणखी एक पोलिसांकडे ‘डेरे’दाखल
तर या अधिवेशनात विधानसभेला नवे अध्यक्ष मिळण्याची शक्यता आहे. त्या प्रकारचे सूतोवाच सत्ताधारी गटाकडून करण्यात आले आहे. यासाठी महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि विधानसभेचे माजी अध्यक्ष नाना पटोले हे दिल्लीत गेले आहेत. त्यांच्यासोबत काँग्रेस नेते सुनील केदार हे देखील होते. त्यामुळे महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष दिल्लीत ठरणार का असा सवाल विचारला जात आहे.
सोबतच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अधिवेशनात उपस्थित राहणार का? असा देखील सवाल विचारला जात आहे. मुख्यमंत्री हे नुकतेच एका मोठ्या शस्त्रक्रियेला सामोरे गेले होते. त्यांच्या प्रकृतीच्या कारणानेच अधिवेशन नागपूर ऐवजी मुंबई येथे घेतले जात आहे. पण मुख्यमंत्र्यांनी चहापानाच्या कार्यक्रमाला हजेरी लावलेली नाही. त्यामुळे अधिवेशनात तरी मुख्यमंत्री येणार का? असा सवाल उपस्थित होताना दिसत आहे.