आजपासून महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. बुधवार २२ डिसेंबर पासून सुरु होणाऱ्या या अधिवेशनामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सरकारला विविध मुद्द्यांवरून घेरण्यासाठी विरोधक तयारीत बसले आहेत. तर या अधिवेशनात काही महत्त्वाच्या कायदेशीर सुधारणा करण्याच्या तयारीत सरकार दिसत आहे.
या अधिवेशनात ओबीसी आरक्षण, परीक्षांचे घोटाळे, शिवभोजन थाळीतील भ्रष्टाचार, विद्यापीठ कायद्यातील प्रस्तावित बदल, अमरावती मध्ये उसळलेली दंगल, सरकारचा कारभार, अशा अनेक मुद्द्यांवरून सरकारला घेरण्याचा तयारीत विरोधक आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेत याचे ट्रेलर दाखवले आहे.
हे ही वाचा:
… म्हणून दहावी- बारावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार अतिरिक्त वेळ
ब्रिटनमधील शीख खासदाराने हिंदू विरोधी ट्विट हटवले
जर्मन नवरदेव आणि रशियन वधू हिंदू पद्धतीने लग्नबंधनात
बारावी परीक्षा १५; तर दहावी ४ मार्चपासून
या अधिवेशनात विरोधी पक्षाच्या १२ आमदारांच्या निलंबनाचा मुद्दाही गाजण्याची शक्यता आहे. तर विरोधकांचे संख्याबळ कमी असल्याचा फायदा उठवत विधानसभा अध्यक्षांची निवडणूक पार पाडण्याचा घाट सरकार मार्फत घातला जात आहे. याची खलबते दिल्ली येथे पार पडली आहेत. त्यामुळे या अधिवेशनात विधानसभेला नवे अध्यक्ष मिळण्याची शक्यता आहे.
दरम्यान या अधिवेशनात आपण काही महत्त्वाचे गौप्यस्फोट करणार असल्याच्या वल्गना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी केल्या होत्या. त्यामुळे मलिक या अधिवेशनात नेमके काय मांडणार आहेत याचीही चर्च रंगताना दिसत आहे.
यावेळी विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन हे नागपूर ऐवजी मुंबईत पार पडत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रकृतीच्या कारणामुळे अधिवेशन मुंबईत घेतले जात आहे. तर अधिवेशनाचा कालावधी हा केवळ पाच दिवसांचा ठेवण्यात आला आहे.