महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सभागृहाचे कामकाज सुरु होण्याच्या आधीपासूनच विरोधक आक्रमक झालेले पाहायला मिळाले आहेत. विधिमंडळाच्या पायर्यांवर बसून विरोधी पक्षाच्या आमदारांनी सरकार विरोधात आंदोलन केले आहे. राज्यातल्या विविध प्रश्नांना वाचा फोडत सरकारच्या कारभारात विरोधात जोरदार घोषणाबाजी विरोधक करताना दिसले.
यावेळी विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस तसेच विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर हे उपस्थित होते. तर त्यासोबतच भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील आणि इतर महत्त्वाचे नेते आणि आमदार उपस्थित होते. यावेळी ‘ठाकरे सरकारचा धिक्कार असो’ अशा घोषणा विरोधकांनी दिल्या आहेत. तर राज्यात झालेल्या परीक्षा घोटाळ्याची सीबीआय चौकशी झाली पाहिजे अशी मागणीही विरोधक करताना दिसले.
हे ही वाचा:
विधिमंडळ हिवाळी अधिवेशनाचा आजपासून श्रीगणेशा
जर्मन नवरदेव आणि रशियन वधू हिंदू पद्धतीने लग्नबंधनात
हिवाळी अधिवेशनात विधानसभेला मिळणार नवे अध्यक्ष महोदय?
मुख्यमंत्र्यांचे विश्वासू रवींद्र वायकरांची ईडीकडून ८ तास चौकशी
यावेळी विरोधकांच्या मार्फत परीक्षा घोटाळा, शेतकऱ्यांची वीज बिल माफी, शेतकऱ्यांना न करण्यात आलेली मदत, ओबीसींचे राजकीय आरक्षण अशा विविध मुद्द्यांवरून सरकारचा निषेध करण्यात आला. विरोधकांच्या घोषणाबाजीने यावेळी सारा विधिमंडळ परिसर दणाणून गेला होता.
दरम्यान विधिमंडळाचे कामकाज ११ वाजता सुरु झालेले आहे. अवघ्या पाच दिवसांच्या अधिवेशन कालावधीत पहिल्याच दिवसापासून राजकीय वातावरण तापलेले पाहायला मिळत आहे. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे या अधिवेशनाला उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री नेमके केव्हा हजरेई लावणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.