विधानसभा अध्यक्ष पद, महाविकास आघाडीचेच ठरेना

विधानसभा अध्यक्ष पद, महाविकास आघाडीचेच ठरेना

विधानसभा अध्यक्ष पदावरुन महाविकास आघाडीत मतभेद झाले आहेत का? असा प्रश्न सध्या उपस्थित करण्यात येत आहे. सध्या सुरु असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेण्याची मागणी काँग्रेसकडून केली जात आहे. अशातच शिवसेना आणि राष्ट्रवादी मात्र अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेण्यास अनुकूल नसल्याचे कळत आहे.

सध्या विधानसभेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असून अधिवेशनाच्या कामकाजाचे शेवटचे दोन दिवस उरले आहेत. अशातच १० मार्च रोजी विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे काँग्रेसची अशी मागणी आहे की, या अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेण्यात यावी. परंतु, अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर काही आमदारांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या होत्या. परंतु, रिपोर्ट्स आले नसल्यामुळे हे आमदार उपस्थित राहू शकलेले नाहीत. अशातच जर विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेण्यात आली, तर किती आमदार उपस्थित राहू शकतील, हा मोठा प्रश्न आहे. त्याचसोबत अर्थसंकल्प सादर केल्यानंतर त्यावरील चर्चा आणि तो मंजूर करुन घेणं हे सरकारचं प्राधान्य आहे. त्यामुळे तुर्तास अध्यक्षपदाची निवडणूक घेण्यासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी अनुकूल नाहीत.

हे ही वाचा:

विधानसभा अध्यक्ष पदावरून काँग्रेसमध्ये रस्सीखेच

आज झालेल्या कॅबिनेट बैठकीत विधानसभा अध्यक्ष निवडणूकीवर चर्चा झाली. या बैठकीत काँग्रेसने अध्यक्ष पदाची निवडणूक याच अधिवेशनात घ्यावी ही भूमिका मांडली आहे. परंतु, शिवसेना आणि राष्ट्रवादीने आपले प्राधान्य सध्या अर्थसंकल्प मंजूर करुन घेणे असल्याचे सांगितले. परंतु, काँग्रेस आपल्या भूमिकेवर ठाम आहे. विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसकडे आहे, तसेच विरोधी पक्षांकडूनही रिक्त असलेल्या विधानसभा अध्यक्षपदावरुन महाविकास आघाडी सरकारवर ताशेरे ओढले जात आहेत. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष निवडणूकीवरुन महाविकासआघाडीत एकमत होताना दिसत नाहीये. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष पदावरुन महाविकास आघाडीत मतभेद झाले आहेत का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

Exit mobile version