मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी धार्मिक आणि सार्वजनिक ठिकाणी निर्धारित केलेल्या डेसिबलपेक्षा जास्त आवाज असणाऱ्या लाऊडस्पीकरच्या वापरावर बंदी घातली आहे.
मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर मोहन यादव यांनी पहिला मोठा निर्णय घेतला आहे. धार्मिक स्थळांवर नियमापेक्षा अधिक डेसिबलपातळी असलेला लाऊडस्पीकर वापरण्यास बंदी घालण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. या आदेशात जुलै २००५च्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा दाखला देण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, सार्वजनिक ठिकाणी रात्री १० ते सकाळी सहा (सार्वजनिक आपत्कालीन परिस्थिती वगळता) या कालावधीत लाऊडस्पीकर आणि संगीत प्रणाली वापरण्यास बंदी घालण्यात आली होती. अशा भागांत राहणाऱ्या नागरिकांच्या आरोग्यावर ध्वनी प्रदूषणाचे गंभीर परिणाम होतात.
२८ ऑक्टोबर २००५ रोजी सर्वोच्च न्यायालयाने वर्षातील १५ दिवस सणासुदीच्या प्रसंगी मध्यरात्रीपर्यंत लाऊडस्पीकर वापरण्याची परवानगी देण्याचा निर्णय दिला होता. तसेच, २२ जानेवारी २०२४ रोजी होणार्या राम मंदिराच्या अभिषेकासाठी अयोध्येत जाणाऱ्या भाविकांचे मध्य प्रदेश सरकार स्वागत करेल, असेही यादव यांनी जाहीर केले.
हे ही वाचा:
‘प्रेक्षक पाससाठी घुसखोर सातत्याने सेक्रेटरीच्या संपर्कात’
काश्मीर मध्ये धावणार वंदे भारत
संसदेतील घुसखोरांवर UAPA अंतर्गत गुन्हा दाखल
पाकस्थित गुप्तचर एजंटच्या संपर्कात आलेल्या तरुणाला ठाण्यातून अटक
उघड्यावर मांस व अंडीविक्री करणाऱ्यांवर कारवाई
मध्य प्रदेशच्या नवनियुक्त मुख्यमंत्र्यांनी उघड्यावर केल्या जाणाऱ्या मांस आणि अंडीविक्रीवर कारवाई करण्यात येणार असल्याची घोषणाही केली. १५ ते ३१ डिसेंबर या कालावधीत उघड्यावर मांस व मासेविक्री बंदीची अंमलबजावणी करण्यासाठी अन्न विभाग, पोलिस आणि स्थानिक नागरी संस्थांमार्फत मोहीम हाती घेतली जाईल, असे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी सांगितले.