शिवसेनेच्या वचननाम्यात मराठी भाषेसंदर्भात दिलेली वचने कधी पूर्ण करणार?

शिवसेनेच्या वचननाम्यात मराठी भाषेसंदर्भात दिलेली वचने कधी पूर्ण करणार?

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्‍यासाठी मंत्री दर्जाचे विशेष खाते निर्माण करण्याचे वचन मराठी राजभाषा दिनाचे औचित्‍य साधून मुख्यमंत्री पूर्ण करणार का? असा प्रश्न भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांनी विचारला आहे. मंगळवार, २२ फेब्रुवारी रोजी भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

भांडारी यांनी सांगितले की, २०१९ च्‍या विधानसभा निवडणुकी वेळी शिवसेनेतर्फे प्रसिध्‍द करण्‍यात आलेल्या वचननाम्‍यात मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्‍यासाठी मंत्री दर्जाचे विशेष खाते निर्माण करण्याबरोबरच मराठीचे पुरातन दस्‍तावेज, ऐतिहासिक व सांस्‍कृतीक महत्‍व जाणून घेवून देश विदेशातील विविध भाषांमध्‍ये देवाण-घेवाण करण्‍यासाठी जागतीक मराठी विद्यापीठ निर्माण करणार, या खेरीज मराठी भाषेची गोडी युवकांमध्‍ये निर्माण व्‍हावी म्‍हणून १० वी व १२ वी मधील मराठी भाषा परिक्षेत ८० टक्‍क्‍याहून अधिक गुण प्राप्‍त करणा-या विद्यार्थ्‍यांना विशेष शिष्‍यवृत्‍तीने सन्‍मानित करण्‍याची वचने सुध्‍दा शिवसेनेच्या वचननाम्‍यात देण्‍यात आली होती. मात्र या वचनांची पूर्तता झालेली नाही असे भांडारी यांनी निदर्शनास आणून दिले.

हे ही वाचा:

रशिया-युक्रेन प्रश्न चर्चेतून सोडवावा

‘संजय राऊत यांच्याकडे एवढी संपत्ती कुठून आली?’

रशिया-युक्रेन संकटामुळे शेअर बाजार कोसळला….

पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यापूर्वी मणिपूरमध्ये दोन दहशतवादी अटकेत

मराठी राजभाषा दिनाचे औचित्‍य साधून वरील वचने पूर्ण करण्‍याच्‍या दृष्‍टीने शासनाने निर्णय जाहीर करावा आणि माय मराठीचा यथोचित सन्‍मान करावा, अशी भाजपाची मागणी असल्याचे भांडारी यांनी नमूद केले.शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी नुकतीच मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी दिल्ली वारी केली आणि केंद्रीय मंत्र्यांची भेट घेतली आहे. याबाबतच भाजपाने शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे.

Exit mobile version