महाराष्ट्र राज्यात कोरोनाची परिस्थिती अतिशय गंभीर झाली असून महाराष्ट्र सरकारने या विषयात कडक निर्बंध लावण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात रविवारी राज्य मंत्रिमंडळाची महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार महाराष्ट्रात आठवड्यातले पाच दिवस कडक निर्बंध असतील तर शनिवार, रविवार संपूर्ण लॉकडाऊन असेल. अशा कठीण परिस्थितीत विरोधी पक्ष सरकारला संपूर्ण सहकार्य करेल अशी भूमिका भारतीय जनता पार्टीतर्फे घेण्यात आली आहे तर जनतेनेही सरकारला सहकार्य करावे असे आवाहन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.
रविवारी महाराष्ट्र सरकारने घेतलेल्या निर्णया संदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथून आपली भूमिका मांडली. “राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाला नागरिकांनी सहकार्य करावे. भारतीय जनता पार्टीचे सगळे कार्यकर्ते सरकारला सहकार्य करतील. भाजपाच्या कार्यकर्त्यांनी लसीकरण मोहिमेत मदत करावी. लोकांना लसीकरण नोंदणीत मदत करावी आणि त्यांना लसीकरण केंद्रावर घेऊन जाण्यात सहकार्य करावे. एकीकडे नव्या स्ट्रेनची चर्चा होत असताना सरकारने या नव्या स्ट्रेन संदर्भातही प्रबोधन करावे. हा स्ट्रेन काय आहे? त्याची लक्षणे काय आहेत? लोकांनी काय काळजी घ्यायला पाहिजे? यात काय अडचणी येत आहेत? यावर प्रबोधन व्हावे. राज्यात केसेस वाढत आहेत. पण त्या मानाने आरोग्य सुविधांची कमतरता आहे. तेव्हा सरकारने याबाबतही चर्चा करून नियोजन केले पाहिजे. अशीच रुग्णवाढ होत राहिली तर येत्या काही दिवसात महाराष्ट्राची परिस्थिती भयावह होईल तर सरकारचा या संदर्भात नेमका काय रोडमॅप आहे हे सरकारने जाहीर करावे.” अशी मागणी फडणवीस यांनी केली.
हे ही वाचा:
राज्यात ‘विकेंड’ लॉकडाऊन, काय आहेत नवे नियम?
कोळसा घोटाळ्यात ममतांचे हात काळे
आम्ही जनतेसोबत, पण सरकारच्या उपाययोजनांना आमचा पाठींबा
मुख्यमंत्र्यांनी केली देवेंद्र फडणवीस, राज ठाकरेंशी चर्चा
सरकारने पॅकेज जाहीर करावे
“या लॉकडाऊनचा खूप विपरीत परिणाम अनेक उद्योजक, व्यावसायिक, मजूर, कष्टकरी यांच्यावर पडणार आहे. त्यामुळे सरकारने त्यांनाही मदत करायचा निर्णय घेतला पाहिजे. त्यासाठी एक विशेष पॅकेज जाहीर करायचा निर्णय सरकारने घ्यावा. तसेच लॉकडाऊनच्या काळातही सरकारने राज्याच्या जनतेकडून महावितरणच्या माध्यमातून पाच हजार कोटींची अतिरिक्त वसुली केली आहे आणि दुसऱ्या बाजूला नागरिकांची वीज कनेक्शन्स कापली जात आहेत. तेव्हा सरकारने वीज कनेक्शन कापणीच्या कार्यक्रम थांबवावा. कारण लोकांकडे रोजगार नाहीये, नोकरी नाहीये, अशा परिस्थिती त्यांची वीज तोडणे हा तुघलकी निर्णय ठरेल.” असे फडणवीस म्हणाले.