लोकसभा निवडणुकीचे दोन टप्पे यशस्वी पार पडले असून आता उर्वरित टप्प्यांसाठीच्या प्रचार कामाला वेग आलेला आहे. अशातच उर्वरित जागांवर रिंगणात उतरलेल्या उमेदवारांची नावे देखील जाहीर होत आहेत. मुंबईतील एका जागेवर महायुतीने आपला उमेदवार जाहीर केला आहे. उत्तर पश्चिम मुंबई येथून शिवसेना नेते रवींद्र वायकर यांना तिकीट मिळाल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेकडून लोकसभा निवडणुकीत मुंबईतील उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून आमदार रवींद्र वायकर यांची वर्णी लागली आहे. वायकर यांना मुंबईच्या जागेवरून उमेदवारी दिली जाण्याची चर्चा अनेक दिवसांपासून होती. यासाठी अनेक दिवस महायुतीमधील वरिष्ठ नेत्यांच्या बैठका सुरू होत्या. अखेर रवींद्र वायकरांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.
दुसरीकडे महाविकास आघाडीकडून उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून ठाकरे गटाच्या अमोल कीर्तिकर यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यामुळे आता अमोल कीर्तिकर विरुद्ध रवींद्र वायकर असा सामना पाहायला मिळणार आहे. राज्यातल्या अनेक जागांवर महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना रंगणार आहे.
हे ही वाचा:
संदेशखाली प्रकरणातील पीडित, भाजपा उमेदवार रेखा पात्रा यांना ‘एक्स-श्रेणी’चे सुरक्षाकवच
राज्यघटनेच्या प्रस्तावनेतून ‘समाजवादी’, ‘धर्मनिरपेक्ष’ शब्द वगळण्याची मागणी
अमित शहांचा बनावट व्हिडिओ: आसाम काँग्रेसच्या वॉर रूमचे समन्वयक रीतम सिंग अटकेत
मीरारोड लव्ह जिहाद प्रकरण; आरोपी मोहसीन शेखला अटक!
मुंबई उत्तर-पश्चिम मतदार संघात उमेदवारीवरुन बराच काळ चर्चा सुरू होत्या. या मतदार संघासाठी अभिनेता गोविंदासह अनेक नावं चर्चेत होती. अखेर सोमवारी रात्री मुख्यमंत्री शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी वायकरांसोबत झालेल्या बैठकीत निर्णय झाल्याचं सांगण्यात येत आहे. सुरुवातीला रविंद्र वायकर खासदारकीची निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक नसल्याचं सांगण्यात येत होतं. तसंच वायकर यांच्या नावाला मित्रपक्षातून विरोध होत असल्याचीही चर्चा होती. मात्र, अखेर शिवसेनेने आपल्या उमेद्व्राच्या नावाची घोषणा केली आहे.