ठाणे लोकसभेवर निवडणुकीच्या रिंगणात महायुतीकडून कोण उतरणार याकडे सर्वांचे लक्ष असतानाचं शिवसेनेकडून याबाबत मोठी घोषणा करण्यात आली आहे. शिवसेनेचा आणि एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यातून नरेश म्हस्के हे लोकसभा निवडणुकीसाठी रिंगणात असणार आहेत. ठाण्यातून शिवसेना नेते नरेश म्हस्के यांना संधी देण्यात आली आहे. तर, कल्याणमधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक प्रक्रियेला सुरूवात झाली असली तरी महायुतीने या जागांवर आपले उमेदवार दिलेले नव्हते. अखेर या जागांवरील उमेदवारांची घोषणा झाली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन आठवड्यांपूर्वी श्रीकांत शिंदे यांचे नाव जाहीर केले होते. अखेर शिवसेनेकडून नरेश म्हस्के आणि श्रीकांत शिंदे यांच्या नावांची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे ठाण्यात आता महाविकास आघाडीकडून राजन विचारे विरुद्ध महायुतीचे नरेश म्हस्के अशी लढाई रंगणार आहे.
लोकसभा निवडणूक – २०२४ साठी कल्याण लोकसभा मतदारसंघातून श्री. श्रीकांत एकनाथ शिंदे आणि ठाणे लोकसभा मतदारसंघातून श्री. नरेश गणपत म्हस्के यांचे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार म्हणून नाव घोषित करण्यात आले आहे. त्यांना लोकसभा निवडणुकीसाठी हार्दिक शुभेच्छा !#Shivsena #LokasabhaElection2024 pic.twitter.com/XYJjTUy0r8
— Shivsena – शिवसेना (@Shivsenaofc) May 1, 2024
हे ही वाचा:
महाराष्ट्रात पंतप्रधान मोदींचा षटकार!
कर्नाटकातील कॉंग्रेस सरकारने रेवण्णावर का कारवाई केली नाही ?
काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांच्या भाचीने केली ‘व्होट जिहाद’ ची घोषणा
शरद पवार कृषिमंत्री असताना काय केले?
नरेश म्हस्के हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय मानले जातात. दोन वर्षांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यापासून नरेश म्हस्के एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत. ठाणे लोकसभेसंदर्भात मुख्यमंत्री शिंदेंच्या निवासस्थानी काही प्रमुख नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत अंतीम निर्णय झाल्याची माहिती मिळाली आहे. या वेळी मुख्यमंत्र्याच्या घरी नरेश म्हस्के, प्रताप सरनाईक, रवींद्र फाटक, मीनाक्षी शिंदे यांच्यासोबत बैठक पार पडली. उमेदवार कोणी असो सर्व ताकद लावली जाणार असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी सर्वांनी दिले, त्यानंतर नरेश म्हस्के यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आहे.