काही दिवसांपूर्वीच ब्रिटनमध्ये लिझ ट्रस यांचे सरकार स्थापन झाले होते. मात्र, आता त्यांचे सरकार संकटात सापडले आहे. ट्रस यांना हटवण्याच्या हालचाली सुरू झाल्या असून माजी अर्थमंत्री ऋषी सुनक यांच्याकडे नेतृत्व दिले जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. वादग्रस्त ‘मिनी बजेट’ मधील कररचनेवर माघार घ्यावी लागत असल्याने ट्रस यांनी अर्थमंत्री क्वासी क्वारतेंग यांची हकालपट्टी केली आहे.
‘मिनी बजेट’मधील कररचनेमुळे ब्रिटनची अर्थव्यवस्था प्रचंड धोक्यात आली आहे. यातील आणखी काही करसवलती मागे घेण्यात येणार असल्याची माहिती आहे. त्यानंतर ‘यू-जीओव्ही’ या संकेतस्थळाने केलेल्या सर्वेक्षणानुसार पक्षाच्या ६२ टक्के सदस्यांनी चुकीचा नेता निवडल्याची भावना व्यक्त केली आहे.
दुसरीकडे अर्थमंत्री क्वारतेंग यांनी राजीनामा दिल्याची बातमी होती. मात्र, त्यांची ट्रस यांनीच हकालपट्टी केल्याचे समोर आले आहे. त्यांनी स्वत:च ट्विटरवर आपले राजीनामापत्र टाकले आहे. त्यानुसार ट्रस यांनी क्वारतेंग यांना राजीनामा देण्यास सांगितल्याचे स्पष्ट झाले आहे. क्वारतेंग यांच्या जागी ट्रस यांनी जेरेमी हंट यांची अर्थमंत्रीपदी नियुक्ती जाहीर केली आहे. माजी पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांच्या राजीनाम्यानंतर हंट स्वत: पंतप्रधानपदाच्या शर्यतीत होते. मात्र, त्यांना पुरेशी मते नसल्यामुळे त्यांनी ऋषी सुनक यांना पाठिंबा जाहीर केला होता.
हे ही वाचा:
‘महिला आणि मुलींकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्यांची गय नाही’
दारूच्या नशेत मुलीला फरफटत नेलेला रिक्षाचालक अटकेत
शिंदे फडणवीस सरकारने दिली शेतकऱ्यांना दिवाळी भेट
कोळसा खाणीत झालेल्या स्फोटात २२ जणांचा मृत्यू
पक्षाच्या घटनेनुसार एकदा नेता निवडल्यावर १२ महिने त्याला आव्हान देता येत नाही, मात्र ‘१९२२ बॅकबेंचर्स कमिटी’ ही पार्लमेंट सदस्यांची प्राधिकृत समितीमध्ये मतदान घेऊन नेत्याला हटवले जाऊ शकते. आगामी निवडणुकीत ट्रस यांच्या धोरणांमुळे पक्षाला फटका बसेल, याची खात्री झाली तर ही समिती त्यांना हटवू शकते. बॅकबेंचर्स कमिटीने पाठिंबा दिल्यास ऋषी सुनक पंतप्रधान आणि पक्षांतर्गत निवडणुकीत तिसऱ्या क्रमांकावर असलेले पेनी मॉर्डंट उपपंतप्रधान होऊ शकतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.