पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मतदारसंघातील प्रकार
एकीकडे कोविडच्या महामारीत अनेक गरीब गरजूंना अन्नधान्य मिळायचीही वानवा होत असतानाच ठाण्यात मात्र शिवसेनेकडून मद्य वाटपाचा कार्यक्रम करण्यात आल्याची चर्चा रंगली आहे. ठाण्यातील शिवसेनेच्या एका स्थानिक नगरसेवकांनी आमदार रवींद्र फाटक यांच्या कार्यालयातून मद्य वाटप केल्याची तक्रार ठाण्यातील एका सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे. विशेष म्हणजे हा सारा प्रकार शिवसेना नेते आणि ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच मतदार संघात झाला आहे. त्यामुळे या साऱ्या प्रकारावरूनच पालकमंत्री शिंदे यांना लक्ष्य केले जात आहे.
शिवसेनेचा गड मानला जाणाऱ्या ठाणे महानगरपालिका क्षेत्रात पक्षाचा चांगलाच दबदबा आहे. ठाणे महानगरपालिका गेली अनेक वर्ष शिवसेनेच्या ताब्यात आहे. पण अशा परिस्थितीत शहरातील गरजूंना दिलासा देण्याचे काही उपक्रम राबवण्याऐवजी मद्य वाटपा सारखे कार्यक्रम समोर येत आहेत. शिवसेनेचे राज्यातील महत्त्वाचे नेते आणि ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मतदारसंघातच हा मद्यवाटपाचा प्रकार समोर आल्यामुळे साऱ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत. यासंबंधी ठाण्यातील सामाजिक कार्यकर्ते प्रकाश सुर्वे यांनी तक्रार केली आहे. ठाणे पोलीस, ठाणे महानगरपालिका आयुक्त आणि उत्पादन शुल्क विभाग यांच्याकडे ही तक्रार दाखल करण्यात आली आहे.
हे ही वाचा:
मुख्यमंत्र्यांचे ज्ञान, अज्ञान की वाफा?
लसीकरण झालेल्यांना लोकलने प्रवास करायला द्या
धनगर समाज आरक्षणासाठी जागर करणार
अनिल देशमुख, १०० कोटी प्रकरणात, ईडीकडून पाच बारमालकांची चौकशी
तर याच मुद्द्यावरून भारतीय जनता पार्टीची आक्रमक झालेली दिसत आहे. ठाणे भाजपाचे अध्यक्ष आणि कोकण पदवीधर मतदार संघाचे आमदार निरंजन डावखरे यांनी या सार्या प्रकरणावरुन शिवसेनेवर निशाणा साधला आहे. हे प्रकार म्हणजे स्वर्गीय आनंद दिघे यांच्या संस्कारांना शिवसेनेने दिलेली तिलांजली आहे असे मत डावखरे यांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे आता या मद्यवाटपाच्या प्रकारावरून ठाण्याचे राजकारण तापण्याची शक्यता आहे.
ठाण्यात पालकमंत्र्यांच्या मतदारसंघात शिवसेना नगरसेवकाकडून खुलेआम मद्य वाटप …स्वर्गीय आनंद दिघे साहेबांच्या विचारांना शिवसेनेकडून ठाण्यात तिलांजली ?? pic.twitter.com/cLIsru0OBc
— BJP4Thane (@BJPforThane) May 25, 2021