काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांना केंद्र सरकारने दणका दिला आहे. सोनिया गांधी अध्यक्ष असलेल्या ‘राजीव गांधी फाउंडेशन’ या स्वयंसेवी संस्थेवर केंद्रीय गृहमंत्रालयाने कारवाई केली आहे. परदेशी योगदान (नियमन) कायद्यांतर्गत गृह मंत्रालयाने राजीव गांधी फाउंडेशनचा परवाना रद्द केला आहे. राजीव गांधी फाउंडेशनवर विदेशी निधीचा गैरवापर केल्याचा आरोप आहे. परदेशातून येणाऱ्या निधीबाबतच्या नियमांचे उल्लंघन केल्याने राजीव गांधी फाउंडेशनवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.
‘राजीव गांधी फाउंडेशन’ ही गांधी कुटुंबाशी संबंधित संस्था आहे. फाउंडेशनवर विदेशी निधी कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे. गृह मंत्रालयाच्या चौकशी समितीच्या अहवालाच्या आधारे ही कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. जुलै २०२० मध्ये गृह मंत्रालयाने ही चौकशी समिती स्थापन केली होती. या संस्थेला चीनकडून मदत मिळत असल्याचा आरोप भाजपकडून सातत्याने करण्यात येत होता. या कारवाईनंतर ‘राजीव गांधी फाउंडेशन’ परदेशातून निधी स्वीकारू शकत नाही.
‘राजीव गांधी फाउंडेशन’चे एफसीआरए लायसन्स केंद्र सरकारकडून रद्द करण्याच्या निर्णयाची माहिती संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. ‘राजीव गांधी फाउंडेशन’ च्या अध्यक्षपदी सोनिया गांधी आहेत. तर माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह, माजी अर्थमंत्री पी. चिंदबरम, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी-वाड्रा हे संस्थेचे विश्वस्त आहेत.
हे ही वाचा:
विश्वचषक स्पर्धेत भारत पाकिस्तानशी भिडणार, पावसाच्या खेळीवर असणार लक्ष
शी जिनपिंग तिसऱ्यांदा चीनच्या राष्ट्राध्यक्षपदी
पुणे रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीत एकाचा मृत्यू
इस्रोची दिवाळी भेट, सर्वात वजनदार रॉकेटचे पहिले व्यावसायिक प्रक्षेपण यशस्वी
केंद्रीय गृहमंत्रालयाने गांधी कुटुंबाशी निगडीत असलेल्या तीन संघटना राजीव गांधी फाउंडेशन (RGF), राजीव गांधी चॅरिटेबल ट्रस्ट (RGCT) आणि इंदिरा गांधी मेमोरियल ट्रस्ट (IGMT) यांची चौकशी करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली होती. जुलै २०२० पासून या संस्थांची चौकशी सुरू करण्यात आली होती. या समितीला मनी लाँड्रिंग कायदा, आयकर कायदा आणि FCRA च्या नियमांच्या उल्लंघनाच्या आरोपांची चौकशी करायची होती.