काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी अखेर भाजपमध्ये प्रवेश केला आहे.मुंबईतील भाजप कार्यालयात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत अशोक चव्हाण यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे.यावेळी चंद्रशेखर बावनकुळे, आशिष शेलार, गिरीश महाजन आदी नेते उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्फूर्ती आणि प्रेरणा घेऊन काम करू
काँग्रेसचे जेष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला.भाजपमध्ये प्रवेश करताच अशोक चव्हाण यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली. अशोक चव्हाण म्हणाले की, मी माझ्या आयुष्याची नवीन सुरुवात करत आहे.सर्वात अगोदर मी पंतप्रधान मोदी, अमित शाह, जेपी नड्डा आणि देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानतो.
महाराष्ट्राची एक वेगळी परंपरा असल्याचे ते म्हणाले.ते पुढे म्हणाले की, आमचे एकमेकांविषयी असलेले संबंध आणि राजकारणाच्या पलीकडे जाऊन एकमेकांना साथ दिली आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्फूर्ती आणि प्रेरणा घेऊन या देशामध्ये चांगले काम करता आले पाहिजे. देशाच्या राज्याच्या प्रगतीमध्ये निश्चित योगदान दिले पाहिजे.त्याच भूमिकेतून मी आज पक्ष प्रवेश करत आहे. गेल्या ३८ वर्षाच्या राजकीय प्रवासात आज मी बदल करत आहे, असे अशोक चव्हाण म्हणाले.
हे ही वाचा:
बनावट हलाल सर्टिफिकेट देणाऱ्यांच्या उत्तर प्रदेश एसटीएफने आवळल्या मुसक्या
केरळच्या सत्ताधारी खासदाराने मोदींसह घेतले जेवण!
मंदिरातील ४० किलोच्या सिंहासनासह चोर पळाले
रामायण, महाभारत काल्पनिक असल्याचे धडे दिल्यानंतर बंगळूरूमध्ये शिक्षिकेचे निलंबन
उपमुख्यमंत्री फडणवीस जसे सांगतील तसे काम करू
भाजप पक्षाची जी काही ध्येय धोरणे आहेत, त्यानुसार काम करेन.पक्षाकडून जसे आदेश येतील, उपमुख्यमंत्री फडणवीस जे काम सांगतील ते काम करणार आहे.मी स्वतः काही मागणी केली नाही.मला जसे आदेश येतील तसे काम माझाकडून केले जाईल.मी काँग्रेसमधील सहकाऱ्यांचेही आभार मानतो. त्यांनी सहकार्य केलं.पक्ष बदलण्याचा निर्णय हा माझा वैयक्तिक निर्णय आहे.मी जास्त काही बोलणार नाही, मी पक्षात नवीन आहे, योग्यवेळी योग्य गोष्ट बोलेन, असे अशोक चव्हाण म्हणाले.
पंतप्रधान मोदींच्या कामावर आम्ही इम्प्रेस
राज्यात भाजपाला जास्तीत जास्त जागा मिळतील याचा प्रयत्न करणार आहे.माझा जो अनुभव आहे तो पणाला लावेल.देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘सबका साथ सबका विकास’ या ब्रीदवाक्येने अनेक काम केली आहेत.आम्ही सुद्धा पंतप्रधान मोदींच्या कामावर इम्प्रेस झालो आहोत.आम्ही विरोधात असताना कधीही वैयक्तिक टीका केली नाही. चांगल्या कामाचं आम्ही नेहमी कौतुक केलं आहे.उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी आमच्याही कामाचे कौतुक केले आहे.इथून पुढे आम्ही मिळून एकत्र काम करू, असे अशोक चव्हाण म्हणाले.