मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पंढरपूर दौऱ्यावरुन हल्लाबोल केला आहे. मुख्यमंत्री जसे स्वत: गाडी चालवत विठ्ठलाच्या भेटीला आले, तसेच ते स्वत: गाडी चालवत मंत्रालयात सुद्धा जाऊदेत. असा शेरा संदीप देशपांडे यांनी लगावला. देशपांडे यांनी ट्विट करुन उद्धव ठाकरेंवर हल्ला चढवला.
संदीप देशपांडे म्हणतात, ”हे बा विठ्ठला जसे आमचे मुख्यमंत्री स्वतः गाडी चालवत तुझ्या भेटीला आले तसेच स्वतः गाडी चालवत मंत्रालयात सुद्धा जाऊदे आणि जशी तुझी भेट घेतली तशी एकदा जनतेशी पण भेट घेउदे हीच तुझ्या चरणी प्रार्थना.”
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल रुक्मिणीच्या शासकीय पूजेसाठी काल दुपारी पंढरपूरला रवाना झाले. काल रात्री ९ च्या सुमारास ते पंढरपुरात दाखल झाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपल्या कुटुंबासह मुंबईतील मातोश्री निवासस्थानावरुन दुपारी अडीचच्या सुमारास पंढरपूरकडे रवाना झाले होते. यावेळी ते स्वत: ड्रायव्हिंग करत होते.
हे ही वाचा:
३४ जणांचा जीव जाऊनही महानगरपालिका २ वर्षांपासून सुस्त
मुलगा केंद्रीय मंत्री; पण आईवडील शेतात समाधानी
अश्लिल चित्रपटनिर्मितीप्रकरणी राज कुंद्रा अटकेत
केरळमध्ये ईद साजरी करताना कोरोनाचा धोका नाही
आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंढरपुरात पत्नी रश्मी ठाकरे यांच्यासह विठ्ठल-रखुमाईची शासकीय महापूजा केली. यावेळी वर्धा जिल्ह्यातील कोलते दाम्पत्याला महापूजेचा मान मिळाला. पहाटे ३ वाजून ४० मिनिटांनी विठ्ठल-रखुमाई यांची शासकीय महापूजा करण्यात आली. आषाढी एकादशीनिमित्त महापूजेसाठी वारकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह विठ्ठल मंदिरातील विणेकरी केशव शिवदास कोलते (वय ७१ वर्ष) आणि इंदुबाई केशव कोलते (वय ६० वर्ष) यांना महापूजा करण्याचा मान मिळाला. केशव कोलते २० वर्षांपासून श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात विणेकरी म्हणून सेवा बजावत आहेत.