राज्यात विधान परिषदेच्या ११ जागांसाठी शुक्रवार, १२ जुलै रोजी निवडणूक पार पडणार आहे. महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा हा निवडणुकीचा सामना रंगणार आहे. या निवडणुकीत मोठी रंगत असून ११ जागांसाठी १२ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे आपापली मते फुटू नयेत यासाठी सर्व पक्ष प्रयत्नशील आहेत.
विधान परिषदेच्या निवडणुकीत क्रॉसव्होटिंग होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यातच ११ जागांसाठी १२ उमेदवार रिंगणात असल्यामुळे कोणातरी एकाचा पराभव होणार हे निश्चित आहे. मतदान शुक्रवारी सकाळी विधानभवनात सुरू झाले असून सायंकाळनंतर निकाल येतील.
विधान परिषदेसाठी भाजपाकडून पंकजा मुंडे, परिणय फुके, सदाभाऊ खोत, अमित गोरखे, योगेश टिळेकर यांना उतरवण्यात आले आहे. तर शिवसेनेकडून भावना गवळी आणि कृपाल तुमाने निवडणूक रिंगणात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजेश विटेकर, शिवाजी गर्जे यांना संधी देण्यात आली आहे. काँग्रेसकडून प्रज्ञा सातव तर ठाकरे गटाकडून मिलिंद नार्वेकर आणि शेकापकडून जयंत पाटील रिंगणात आहेत.
हे ही वाचा:
नेपाळमध्ये भूस्खलन होऊन प्रवाशांनी भरलेल्या दोन बस गेल्या नदीत वाहून
हरियाणात काँग्रेसला झटका, सोनीपतचे महापौर निखिल मदान यांचा भाजपात प्रवेश!
अनेक महिने बर्फात दबलेले तीन जवानांचे मृतदेह लष्कराला सापडले !
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यासह नऊ जणांविरुद्ध तक्रार
शेकापचे जयंत पाटील यांना सात मतांची जुळवाजुळव करावी लागणार आहे तर, अजित पवार गटालाही साधारण तितकीच अतिरिक्त मतं लागणार आहेत. त्यामुळे काँग्रेसची काही मते फुटतील असं राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. दुसरीकडे ठाकरे गटाकडे १५ आमदार असून त्यांना आणखी ८ मते लागतील. त्यामुळे काँग्रेसची मते महत्त्वाची मानली जात आहेत. काँग्रेसकडे १४ मते अतिरिक्त आहेत.